भारतीय पुरुष क्रिकेट संघ नवा प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) नेतृत्वात आपली पहिली मालिका खेळण्यास सज्ज झाली आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरोधातील मालिकेसाठी गौतम गंभीरसह रवाना झाला आहे. गौतम गंभीरसह भारतीय क्रिकेटमधील नवा काळ सुरु होईल अशी चर्चा रंगली आहे. खासकरुन टी-20 मधील कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. याचं कारण कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी वर्ल्डकप विजयासह टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. तसंच वर्ल्डकप जिंकत राहुल द्रविडला (Rahul Dravid) योग्य प्रकारे निरोप दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम गंभीरनेही आपण एका यशस्वी संघाचा कार्यभार स्विकारत असल्याचं मान्य केलं आहे. राहुल द्रविडच्या कार्यकाळात भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप, वर्ल्डकप 2023 च्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. तसंच टी-20 वर्ल्डकप जिंकला. एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये अपराजित राहिलेला भारतीय संघ सहजपणे जिंकेल असं वाटत असतानाच अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने सगळं चित्र पालटलं. यानंतर रोहित शर्मा, विराट कोहलीसह सर्वांना अश्रू अनावर झाले होते. त्यामुळेच जेव्हा टी-20 वर्ल्डकप जिंकला तेव्हा सर्वांच्या भावनांचा बांध फुटला होता. मैदानात असणारा जवळपास प्रत्येक खेळाडू रडत होता. विशेष म्हणजे आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा राहुल द्रविडही यावेळी आक्रमकपणे सेलिब्रेशन करत होता.


राहुल द्रविडने ट्रॉफी हातात घेणं आणि ओरडून सेलिब्रेशन करणं हा आपल्यासाठी फार मोठा क्षण होता असं आर अश्विन (Ravichandran Ashwin) म्हणाला आहे. "विराट कोहलीने जेव्हा राहुल द्रविडकडे ट्रॉफी दिला तेव्हा तो माझ्यासाठी मोठा क्षण होता. मी त्याला ट्रॉफीला मिठी मारताना आणि रडताना पाहिलं. राहुल द्रविड ओरडला आणि रडला. मी त्याला त्या क्षणाचा आनंद घेताना पाहिला. मीही त्यावेळी भावूक झालो होतो," असं अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं.


'राहुल द्रविड घरी बसूनही काम करत होता'


अश्विनने यावेळी राहुल द्रविड कामाप्रती किती समर्पित आहे हेदेखील सांगितलं. 2007 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला तेव्हा राहुल द्रविड त्या संघाचा कर्णधार होता याची आठवण अश्विनने करुन दिली. "मला अशा व्यक्तीबद्दल बोलायचं आहे, जो पवित्र आहे. 2007 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ बाहेर पडला तेव्हा राहुल द्रविड संघाचा कर्णधार होता. त्यानंतर त्याने पुन्हा कधी एकदिवसीय संघाचं नेतृत्व केलं नाही. तो भारतीय संघासह आहे. जर एखादी गोष्ट नीट झाली नाही, सामन्यात पराभव झाला तर ते राहुल द्रविड काय करतोय हे विचारतात", असं आर अश्विन म्हणाला.


"राहुल द्रविड गेल्या 2-3 वर्षांपासून काय करतोय हे मला माहिती आहे. त्याने संघातील समतोल राखला आहे. त्याने दृष्टीकोन बदलण्यासाठी संघावर किती मेहनत घेतली याची माहिती मला आहे. त्याने प्रत्येक खेळाडूला काय दिलं हे मला माहिती आहे. तो घरी बसलेला असतानाही कोणत्या गोष्टी कशा करायच्या याची योजना आखत असतो".