भारतीय क्रिकेट संघाचा माजी आघाडीचा फलंदाज गौतम गंभीर हा नेहमीच काही ना काही वादामुळे चर्चेत असतो. कधी मैदानावर खेळाडूशी घेतलेला पंगा, तर कधी आपल्या विधानामुळे गौतम गंभीर हा नेहमीच चर्चेच्या अग्रस्थानी असतो. भारताने जिंकलेल्या टी-20 आणि 2011 च्या वर्ल्डकपमध्ये गौतम गंभीरने मोलाची भूमिका निभावली होती. याशिवाय कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करतानाही गौतम गंभीरने आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. दरम्यान भारतीय क्रिकेटचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने गौतम गंभीरसंबंधी आपलं मत मांडलं आहे. चाहते आणि क्रिकेटतज्ज्ञ अनेकदा गौतम गंभीरसंबंधी गैरसमज करुन घेतात. पण गौतम गंभीर हा आपण पाहिलेला सर्वात निस्वार्थी क्रिकेटर आहे असं आर अश्विनने म्हटलं आहे. इतकंच नाही तर गौतम गंभीर "भारतातील सर्वात गैरसमज असलेला क्रिकेटर" असल्याचं आर अश्विन म्हणाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"गौतम गंभीर हा सर्वाधिक गैरसमज असलेला भारतीय क्रिकेटर आहे. जेव्हा लढाईची वेळ येते तेव्हा महान व्यक्ती ही एकमेव व्यक्ती असते. तो जास्त व्यक्त होत नसेल. त्याने वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात केलेली खेळी आहेच, पण याशिवायही त्याने अनेक चांगल्या खेळी करत संघाला अंतिम सामन्यात पोहोचवलं. पण गौतम या सामन्यात चर्चा न झालेला हिरो ठरला. त्याने सामन्याचा दबाव आमच्यावर येऊ दिला नाही. तो निस्वार्थी आहे. तो 120-130 वर नाबाद राहू शकला असता. पण तो निस्वार्थ भावनेने खेळायचा. मला त्याच्याबद्दल नेहमीच आदर वाटतो. लोक त्याला त्याच्या पात्रतेपेक्षा खूपच कमी श्रेय देतात," असं आर अश्विनने म्हटलं आहे.


वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात आर अश्विनला रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्यासह तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते. एम ए चिदंबरम स्टेडिअम फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. त्यात आर अश्विन डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याविरोधात आर अश्विनचा रेकॉर्ड चांगला आहे. आर अश्विनने कसोटी सामन्यात डेव्हिड वॉर्नरला 11 वेळा बाद केलं आहे. 


भारताविरुद्ध इंदूर येथे नुकत्याच झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अश्विनचा सामना करताना डेव्हिड वॉर्नरने उजव्या हाताने फलंदाजी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण धावा करणाऱ्या स्मिथलाही आर अश्विनविरोधात संघर्ष करावा लागतो. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये त्याला जास्त संघर्ष करावा लागतो. त्यामुळे चेपॉक येथील पहिल्या सामन्यात आर अश्विनला शार्दूल ठाकूरच्या जागी पसंती दिल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. 


वर्ल्डकप संघ घोषित झाला तेव्हा त्यामध्ये आर अश्विनला स्थान देण्यात आलं नव्हतं. पण अक्षर पटेल दुखापतीमधून न सावरल्याने अखेर शेवटच्या क्षणी आर अश्विनला संधी देण्यात आली. आशिया कपमध्ये आर अश्विनने केलेली कामगिरी पाहता त्याच्या नावाचा विचार करण्यात आला. त्यामुळे वर्ल्डकपमध्येही आर अश्विनकडून फार अपेक्षा आहेत.