नवी दिल्ली : भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा यानं विक्रम केला आहे. पाचव्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर बॉलिंगला आल्यावर रवींद्र जडेजाने एरॉन फिंचच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. फिंचची विकेट घेताच रवींद्र जडेजाने हरभजन सिंगचं रेकॉर्ड मोडलं आहे. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम जडेजाने केला आहे. फिंचची विकेट ही जडेजाची दिल्लीच्या मैदानातली आठवी विकेट होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिरोजशाह कोटला मैदानात वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर केमार रोच, हरभजन सिंग आणि अजित आगरकर यांनी प्रत्येकी सात-सात विकेट घेतल्या आहेत. जडेजाची कोटला मैदानातली ही सहावी मॅच आहे, तर रोचने दोन, आगरकरने तीन आणि हरभजन सिंग याने या मैदानात पाच मॅच खेळल्या आहेत.


विराटला विक्रमाची संधी


दिल्लीच्या या मैदानात आत्तापर्यंत सात खेळाडूंना वनडे मॅचमध्ये शतक करता आलं आहे. यामध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, एबी डिव्हिलियर्स, केन विलियमसन, निक नाईट, रॉस डायस या खेळाडूंनी फिरोजशाह कोटला मैदानात शतक केलं आहे. यापैकी पाच खेळाडूंनी क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे, तर विराट आणि केन विलियमसन हे दोन्ही खेळाडू क्रिकेट खेळत आहेत. विराट कोहलीकडे या मैदानावर दुसरं शतक करण्याची संधी आहे. या मैदानात वनडे क्रिकेटमध्ये अजूनही दोन शतकं कोणत्याही खेळाडूला करता आली नाहीत.


धोनीने खेळल्या सर्वाधिक मॅच


धोनीने या मैदानामध्ये सर्वाधिक ९ मॅच खेळल्या आहेत. यामध्ये धोनीनं ६५ च्या सरासरीने २६० रन केले. सचिनच्या नावावर या मैदानात सर्वाधिक रनचे रेकॉर्ड आहे. सचिनने या मैदानात ८ मॅचमध्ये ३७.५० च्या सरासरीने ३०० रन केले आहेत. मोहम्मद अजहरुद्दीन या मैदानातला दुसरा सगळ्यात यशस्वी बॅट्समन आहे. अजहरुद्दीनने ७ मॅचमध्ये ६६.७५ च्या सरासरीने २६७ रन केले आहेत.