विराट आणि रोहितनंतर आता टीम इंडियाच्या `या` स्टार खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, म्हणाला...
Ravindra Jadeja retirement from T20i cricket : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीने निवृत्ती घेतली होती. अशातच रविंद्र जडेजाने देखील निवृत्ती जाहीर केली आहे.
Ravindra Jadeja announced retirement : टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेचा पराभव करून टी-ट्वेंटी विश्वचषकावर नाव कोरलं. टीम इंडियाने दुसऱ्यांदा इतिहास रचताच कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-ट्वेंटी इंटरनॅशनलमधून निवृत्ती जाहीर केली. अशातच आता रोहित आणि कोहलीनंतर आता रवींद्र जडेजाने देखील आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. खुद्द रवींद्र जडेजाने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
काय म्हणाला Ravindra Jadeja ?
कृतज्ञतेने भरलेल्या अंत:करणाने मी टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांना निरोप दिला आहे. अभिमानाने मी माझ्या देशासाठी नेहमीच माझे सर्वोत्तम दिलं आहे आणि इतर फॉरमॅटमध्ये ते करत राहीन. टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणं हे माझ्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एक शिखर असलेलं स्वप्न पूर्ण झालंय, असं रविंद्र जडेजाने म्हटलं आहे.
रविंद्र जडेजाची टी-ट्वेंटी कारकीर्द
तब्बल 15 वर्षांपूर्वी म्हणजेच 10 फेब्रुवारी 2009 रोजी जडेजाने टी-ट्वेंटी करियरला सुरूवात केली होती. श्रीलंकेविरुद्ध जडेजाने पहिला टी-ट्वेंटी सामना खेळला होता. डेब्यू सामन्यामध्ये जडेजाने 4 ओव्हरमध्ये 29 धावा दिल्या होत्या. त्यानंतर जडेजाने चेन्नईकडून चमकदार कामगिरी केली. जड्डूने 74 टी-ट्वेंटी सामन्यात 54 विकेट्स नावावर केल्या आहेत. तर फलंदाजीत त्याने 515 धावा केल्या आहेत.
दरम्यान, रवींद्र जडेजाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये 11 डावात फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने 13 च्या सरासरीने आणि 98 च्या स्ट्राईक रेटने 102 धावा केल्या आहेत. जडेजाला संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. एक ऑलराऊंडर म्हणून रोहित शर्माने त्याच्यावर विश्वास ठेवला होता. मात्र, फलंदाजीत देखील त्याला हवी तशी चमक दाखवता आली नाही. अखेरच्या सामन्यात जड्डूला केवळ एक ओव्हर मिळाली.