Ravindra Jadeja Hits Trolls: भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेमधील पहिला सामना जिंकला असून आजपासून दुसरा सामना सुरु झाला आहे. पहिला सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. या सामन्यात विजय मिळवल्याने भारतीय संघाने आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. तसेच या विजयामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) अॅण्ड कंपनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये अंतिम दोन संघांमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये भारताचा ऑल राऊण्डर रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) दमदार पुनरागमन करत आठ विकेट घेतल्या आणि 70 धावा केल्या. 


जडेजाचे दमदार कामगिरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जडेजाने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या. तसेच त्याने केलेल्या 70 धावांमुळे भारताला 400 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने 223 धावांची आघाडी मिळवल्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं पण ऑस्ट्रेलियाला 100 धावांपर्यंतही मजल मारता आली नाही. ऑस्ट्रेलियन संघ 91 धावांवर तंबूत परतला. या सामन्यानंतरच्या एका मुलाखतीमध्ये रविंद्र जडेजाने त्याला नावं ठेवणाऱ्या आणि सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतलं आहे.


अनेक गोष्टी त्यांना ठाऊक नाही


"ज्या दिवशी मी चांगली कामगिरी करत नाही त्यादिवशी ते मला ट्रोल करतात, चिडवतात. मी या स्तरावर पोहोचण्यासाठी केलेली मेहनत आणि कष्ट त्यांना दिसत नसल्याने ते असं वाटेल ते बोलतात. अनेक छोट्या मोठ्या गोष्टी यात आहेत. मी अनेक गोष्टी यासाठी सॅक्रीफाइज केल्या आहेत. त्या ऐवढ्या आहेत की मला आता त्यापैकी अनेक आठवतही नाहीत," असं जडेजा एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.


कंप्युटरसमोर फुकट बसलेले असतात


"कंप्युटरसमोर फुकट लोक बसलेले असतात. मीम बनवत असतात आणि काहीही लिहित असतात. खरं तर मला त्या गोष्टांचं काही वाटत नाही. त्यांनी हे केलं नसतं तर मी इथपर्यंत आलोच नसतो. त्यांना कल्पना नाही की मी कोणत्या परिस्थितीमधून गेलो आहे. ते म्हणतात की मी आयपीएल खेळतो आणि खूप पैसे कमवतो. माझ्यावर विश्वास ठेवा ते आयपीएलमध्ये तुम्हाला तुमचा चेहरा पाहून सिलेक्ट करत नाही," असंही जडेजा म्हणाला. रविंद्र जडेजा दुखापतीमुळे खेळापासून दूर होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमधून पाच महिन्यानंतर पुनरागमन केलं असून त्याने आपलं संघातील स्थान का महत्त्वाचं आहे हे अधोरेखित केलं आहे.