मुंबई : आयपीएल 2022 पूर्वी खेळाडूंचे मेगा ऑक्शन सुरू आहे, ज्यामध्ये आधीच अस्तित्वात असलेल्या आठ टीमला 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या कायम ठेवलेल्या म्हणजे रीटेन केलेल्या खेळाडूंची माहिती द्यायची आहे. यादरम्यान, लखनौ फ्रँचायझीवर मोठ्या रकमेचा हवाला देऊन इतर संघातील खेळाडू हिसकावून घेतल्याचा आरोप केला गेला आहे. पंजाब किंग्जचा केएल राहुल आणि सनरायझर्स हैदराबादचा रशीद खान यांना ऑफर मिळाल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. या संदर्भात पंजाब आणि हैदराबादच्या वतीने बीसीसीआयकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये कोणत्याही खेळाडूला लिलावापूर्वी पैशांबाबत इतर संघांशी सौदेबाजी करण्यास मनाई आहे. जर खेळाडूने असे केले तर त्यांच्यावरी बॅन लावला जाऊ शकतो असा नियम आहे. आयपीएल 2010 पूर्वी, रवींद्र जडेजा अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये अडकला होता आणि त्याच्यावर एका हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती.


रवींद्र जडेजा 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रात राजस्थान रॉयल्सचा भाग होता. यादरम्यान त्याने 430 धावा केल्या. त्यावेळी राजस्थान संघाने ही स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी या संघाचा कर्णधार शेन वॉर्न जडेजाच्या प्रतिभेने प्रभावित झाला होता.


पण 2010 च्या आयपीएलपूर्वी जडेजाने आयपीएलमधील खेळाडूंशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे मोडल्याचे समोर आले होते. तो त्याच्याच संघाविरोधी असल्याचे लक्षात आले, ज्यामुळे जडेजाच्या विरोधात तक्रार आली आणि त्यानंतर त्याची चौकशी देखील झाली. यात जडेजा दोषी आढळला. त्यावेळी रॉयल्सशी करार असतानाही जडेजाने इतर फ्रँचायझींशी जास्त रकमेसाठी बोलल्याचे सांगण्यात आले.


राजस्थान रॉयल्सचा संघ जडेजाला आयपीएल 2010 पर्यंत आपल्यासोबत ठेवू इच्छित असल्याचे वृत्त होते. मात्र जडेजाला 2009 पर्यंतच राहायचे होते. अशा परिस्थितीत त्याने इतर संघांशी संपर्क साधला. असे करून त्याने नियम मोडला.


आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडून एक निवेदन आले की, जडेजाने मुंबई इंडियन्सच्या प्रतिनिधींशी बोलले होते आणि त्याची मुंबईच्या टीमध्ये येण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत याबाबत करार केला.


यानंतर रवींद्र जडेजावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. आयपीएलचे तत्कालीन कमिशनर ललित मोदी म्हणाले की, अशा प्रकारची वागणूक खपवून घेतली जाणार नाही. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीलाही फटकारले गेले पण दंड ठोठावण्यात आला नाही.


या बंदीमुळे रवींद्र जडेजा आयपीएल 2010 मध्ये खेळला नाही. त्यानंतर त्याला कोच्चि टस्कर्स केरलाने आयपीएल 2011 साठी सोबत घेतले. त्याच्यावर सुमारे 9.50 लाख अमेरिकन डॉलर्स देखील खर्च केले. त्यानंतर पुढच्याच वर्षी ही टीम आयपीएलमधून बाहेर निघाली, ज्यामुळे जडेजा पुन्हा लिलावात आला. यावेळी त्याला चेन्नई सुपर किंग्जने त्याला सुमारे नऊ कोटी रुपये देऊन विकत घेतले, ज्यामुळे जडेजा त्या लिलावाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला.