100, 200 नव्हे तर भारताच्या `या` स्टारला RCB कडून तब्बल 5550 टक्क्यांची पगारवाढ; 27 कोटींचा ऋषभ पंत जवळपासही नाही
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bengaluru) भारताचं भविष्य म्हणून पाहिलं जाणाऱ्या या खेळाडूला तब्बल 11 कोटींमध्ये खरेदी केलं आहे. याआधीची त्याच्या 20 लाखांच्या तुलनेत ही तब्बल 55 पट जास्त वाढ आहे.
आयपीएलमुळे अनेक नवख्या खेळांडूचं आयुष्यच बदलून टाकलं आहे. भारतातील इतर कोणत्याही खेळाच्या तुलनेत आयपीएल या तरुणांना पैसा आणि उज्वल करिअर अशा दोन्ही गोष्टी देत आहे. याचा फायदा भारतीय क्रिकेटलाही होत असून, नवे चांगले खेळाडू मिळत आहेत. आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या दोन दिवसांच्या लिलावत जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढत नवा इतिहास रचण्यात आला आहे. यावेळी पाण्याप्रमाणे पैसा खर्च करण्यात आला. 10 फ्रँचाईजीजनी 120 खेळाडूंवर तब्बल 383.4 कोटी खर्च केले असून, यात भारतीय खेळाडू सर्वाधिक लाभार्थी ठरले आहेत.
या लिलावापूर्वी, कोणताही भारतीय खेळाडू 2016 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने (आताची दिल्ली कॅपिटल्स) युवराज सिंगसाठी सर्वाधिक 16 कोटीच्या आसपासही आला नव्हता. यावेळी, पहिल्या दिवसाच्या पहिल्या फेरीत तो पाच वेळा मोडला गेला. पंजाब किंग्जने अर्शदीप सिंगला 18 कोटींमध्ये खरेदी करत युवराजचा नऊ वर्षांचा लिलाव विक्रम मोडला. काही मिनिटांत, श्रेयस अय्यरने (26.75 कोटी PBKS) हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. लिलावातील सर्वोच्च किंमतीचा त्याचा विक्रम केवळ 21 मिनिटेच राहिला. कारण लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला खरेदी करण्यासाठी 27 कोटी खर्च केले.
पण यादरम्यान कोणताही खेळाडू जितेश शर्माच्या आसपासही येऊ शकला नाही. त्याला 5500 टक्क्यांची पगारवाढ मिळाली असून, हा आयलीएलमधील एक रेकॉर्डच आहे. उजव्या हाताच्या यष्टिरक्षक-फलंदाजला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 11 कोटींमध्ये घेतलं. ही किंमत त्याच्या आधीच्या 20 लाखाच्या आयपीएल पगारापेक्षा 55 पट जास्त आहे. IPL 2022 मेगा लिलावात PBKS ने त्याला त्याच्या मूळ किमतीत घेतल होतं. यानंतर पुढील दोन हंगामांसाठी त्याच किमतीत राखून ठेवलं होते.
जितेश शर्माने मिळवलेलंय यश अविश्वसनीय आहे. आयपीएल 2022 मध्ये पदार्पण केल्यापासून जितेशने कधीही मागे वळून पाहिलेलं नाही. पंजाबसाठी 2022 आणि 2023 मध्ये त्याचे दोन चांगले हंगाम होते. त्याने अनुक्रमे 163 आणि 156 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. 2023 च्या हंगामात त्याने 21 षटकार मारले, ज्यामुळे त्याला भारतीय टी-20 संघात यष्टिरक्षक आणि फिनिशर म्हणून स्थान मिळाले. नियमित कर्णधार शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर गेल्या मोसमात त्याला उपकर्णधारपदी स्थान देण्यात आलं होतं.
RCB ने जितेश शर्मासाठी 11 कोटी का मोजले?
जितेशला यंदाचा हंगाम फार चांगला गेलेला नाही. विदर्भाच्या या क्रिकेटपटूने 131 च्या स्ट्राइक रेटने केवळ 187 धावा केल्या आहेत. तरीही आरसीबीने त्याच्यासाठी एवढी मोठी बोली कशी लावली? यामागे दोन कारणं आहेत.
जितेश शर्मा हा एक विशिष्ट कौशल्य असलेला भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज आहे. तो अशा दुर्मिळ क्रिकेटपटूंपैकी एक आहे जो फिनिशरची भूमिका निभावण्यास अतिशय सोयीस्कर आहे, जी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कठीण गोष्टींपैकी एक मानली जाते. त्यामुळेच तो अजूनही भारतीय टी-20 संघात कायम आहे. या महिन्याच्या सुरुवातीला टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेला 3-1 ने पराभूत करणाऱ्या भारतीय संघाचा तो एक भाग होता.
दुसरं म्हणजे, दिनेश कार्तिकच्या जागी आरसीबीला यष्टीरक्षक फंलदाजाची गरज होती. दिनेश कार्तिकने सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. जितेश हा कार्तिकची जागी घेणारा खेळाडू आहे. तो 5 किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर खेळत उपयुक्त ठरु शकतो. तर विराट कोहली आणि रजत पाटीदार हे फलंदाजी युनिटचा मुख्य भाग बनू शकतात.