`दंगल गर्ल` गीता फोगाटच्या घरी आनंदाची बातमी...
अशा प्रकारे दिली आनंदाची बातमी
मुंबई : जागतिक पातळीवर विविध खेळांमध्ये भारतीय महिला खेळाडूंनी कायमच त्यांची छाप सोडली आहे. अशीच एक खेळाडू म्हणजे गीता फोगाट.
पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या कुस्तीसारख्या खेळात जिद्द आणि समर्पकतेच्या बळावर गीताने या क्षेत्रात स्वत:चं असं वेगळेपण आणि वर्चस्व सिद्ध केलं. क्रीडा क्षेत्रात सर्वांची मनं जिंकणाऱ्या याच खेळाडूच्या आयुष्यात आला आनंदाचं उधाण आलं आहे. याला निमित्तही तसंच आहे.
गीताने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक गोड बातमी सर्वांसमोर आणली आहे. एक सुरेख असा फोटो शेअर करत तिने गरोदरपणाची बातमी दिली. 'एका आईच्या आनंदाला तेव्हाच खऱ्या अर्थाने सुरुवात होते, जेव्हा तिच्यात एक नवा जीव आकारास येत असतो. ज्यावेळी एका जीवाच्या हृदयाचे ठोके सतत ऐकू येतात. शिवाय कोणा एका लहानग्याची हालचाल आपण एकटं नसल्याची सतत जाणीव करुन देत असते', असं कॅप्शन लिहित तुम्ही जगण्याचं आणि जीवनाचं महत्त्वं तेव्हाच जाणू शकाल जेव्हा तो तुमच्या शरीरातच वाढत असेल, अशी सुरेख ओळ तिने लिहिली.
गीतने लिहिलेलं हे कॅप्शन पाहता सध्याच्या घडीला ती गरोदरपणाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेताना दिसत आहे. गीताने हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांनीही या खेळाडूवर आणि तिच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.
गीताने कुस्ती क्षेत्रात संपादन केलेल्या यशाविषयी म्हणावं तर, २०१० मध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तिने कुस्ती या खेळात भारताला पहिलंवहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. ऑलिम्पिक समर गेम्समध्ये पात्र ठरणारी ती पहिली भारतीय पहिलवान होती. २०१६ मध्ये तिने पहिलवान, कुस्तीपटू पवन कुमार याच्याशी लग्नगाठ बांधली होती.