मुंबई : कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आलेले IPL सामने पुन्हा एकदा युएईमध्ये खेळवले जाण्याची शक्यता आहे. आयपीएलचे उर्वरित सामने 18 किंवा 19 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतात. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) उर्वरित 31 सामन्यांसाठी मध्ये वेळ मिळू शकतो. आयपीएल-2021 चे 29 सामने खेळले गेले आहेत. परंतु काही खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने आयपीएल पुढे ढकलण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आयपीएल 2021 ची फायनल 10 ऑक्टोबरला खेळली जाऊ शकते. सामने लवकर संपवण्यासाठी एका दिवसात 2 सामने खेळवले जावू शकतात. कोरोना संसर्गामुळे 2020 मध्ये युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा युएईमध्ये याचे आयोजन होऊ शकते.


भारतात खेळवली गेलेली आयपीएल पुढे ढकलण्यात आल्याने आता यावर पर्याय शोधला जात आहे. यासाठी वेगवेगळ्या देशांचे क्रिकेट बोर्ड आणि आयपीएल फ्रँचायझी यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. असे म्हटले जात आहे की, युएई हे इंग्लंडपेक्षा स्वस्त आहे.


भारतीय संघाचा इंग्लंड दौरा 14 सप्टेंबरला संपेल. भारत इंग्लंडदरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पहिला सामना 4 ऑगस्टपासून सुरू होईल. यापूर्वी इंग्लंडमध्येच भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी चँपियनशिपची फायनलही खेळायची आहे. 29 मे रोजी बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेनंतर आयपीएलची अधिकृत घोषणा होऊ शकेल.


अंदाजे 2200 कोटींचे नुकसान


आयपीएल पुढे ढकलल्यामुळे 2200 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची अपेक्षा होती. बायो बबलमध्ये ही कोरोनाचा संक्रमण झाल्याने आयपीएल स्थगित करावी लागली होती.