दुबई : काल चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना पहायला मिळाला. दरम्यान खराब फलंदाजीवरून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर टीका करण्यात येतेय. तर दुसरीकडे दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या कृत्याचीही चर्चा आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये असं काही झालं की, शेवटच्या ओव्हरमध्ये अंपायरने दिलेल्या निर्णयावर रिकी पॉटिंग भडकला आणि थेट अंपायरला जाब विचारण्यासाठी पोहोचला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, चेन्नईने दिलेलं आव्हान पूर्ण करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स मैदानावर उतरली. यावेळी 20 व्या ओव्हरच्या दरम्यान ड्वेन ब्रावोच्या पहिल्याच बॉलवर शिमरॉन हेयमायरने 2 रन्स काढले. परंतु त्यापुढील ब्रावोचा दुसरा चेंडू त्याच्या हातून निसटला आणि चेंडू खेळपट्टीच्या लांबून येत थेट विकेटमागे जाऊन पडला. यावर अंपायर त्या बॉलला नो बॉल देतील असं वाटत असताना त्यांनी तो वाईड बॉल करार केला. 


अंपायरचा हा निर्णय रिकी पॉटिंगला अजिबात पटला नाही. या निर्णयावर संतापतो थेट बाऊंड्री लाईनच्या जवळ असलेल्या अंपायरकडे गेला. यावेळी त्याने त्या अंपायरकडे तो नो बॉल देण्याची मागणी केली. मात्र अंपायरने त्यांचा निर्णय बदलला नाही. 


दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि चेन्नई सुपर किंग्जला फलंदाजी दिली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने अंबाती रायडूच्या नाबाद अर्धशतकामुळे 5 बाद 136 धावा केल्या आणि दिल्लीला 137 धावांचं लक्ष्य दिलं. दिल्ली कॅपिटल्सने 19.4 षटकांत 7 विकेट गमावत 139 धावा करत सामना जिंकला.