Rinku Singh Batting In T20: उत्तर प्रदेश टी-20 लीगमधील 18 व्या सामना शुक्रवारी रात्री पार पडला. हा सामना कानपूर सुपरस्टार्स (Kanpur Superstars) विरुद्ध मेरठ मेवरिक्सदरम्यान (Meerut Mavericks) खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये मेरठच्या संघाने दमदार विजय मिळवला. मेरठच्या संघाने या सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली. सामन्यामध्ये इंडियन प्रिमिअर लिगच्या माध्यमातून प्रकाश झोतात आलेल्या आणि थेट टीम इंडियापर्यंत मजल मारणाऱ्या रिंकू सिंहने वेगवान खेळी करत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. सामन्यामध्ये रिंकूने वेगात धावा करताना 220 च्या स्ट्राइक रेटने गोलंदाजांची धुलाई केली. मेरठ मेवरिक्सला या सामन्यामध्ये सहज विजय मिळवून देण्यात रिंकून मोलाचा वाटा उचलला असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.


सामन्याची स्थिती काय होती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, कानपुर सुपरस्टार्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मेरठच्या संघाकडून सलामीवीर म्हणून ऋतुराज शर्मा आणि स्वास्तिक चिकारा मैदानात उतरले. ऋतुराजने 47 धावांची दमदार खेळी केली. मात्र स्वास्तिक 17 धावा करुन बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार माधव कौशिकलाही आपल्या बॅटने फारशी कमाल दाखवता आली नाही. केवळ 10 धावा करुन तो तंबूत परतला. संघाची परिस्थिती पाहता कमी चेंडूत वेगाने धावा करणाऱ्या एखाद्या स्फोटक फलंदाजाची गरज होती. त्याचवेळी मैदानात रिंकू सिंहने पाऊल ठेवलं.


मैदानात आल्या आल्या...


आयपीएल 2023 मध्ये सर्वोत्तम फिनिशर्सपैकी एक ठरलेल्या रिंकूने या सामन्यातही मैदानात आल्या आल्या चौकार आणि षटकार मारण्याचा प्रयत्न सुरु केला. तो केवळ 10 चेंडूच खेळला मात्र त्याने त्यात 22 धावा केल्या. यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार होता. रिंकूच्या वेगवान फलंदाजीच्या जोरावर मेरठने 100 धावांचा टप्पा ओलांडला. 200 हून अधिक स्ट्राइक रेटने धावा जमवत रिंकून केलेल्या 22 धावांच्या खेळीमुळे मेरठचा धावफलक 103 धावांपर्यंत पोहोचला. रिंकू नसता तर मेरठचा डाव 100 च्या आतच गुंडळला गेला असता. रिंकूमुळे मेरठच्या धावसंख्येत 20 अतिरिक्त धावांची भर पडली असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.


विरोधकांची घसरगुंडी


मेरठने दिलेलं 104 धावांचं आव्हान कानपुरच्या संघाला पेलवलं नाही. कानपुरचा संपूर्ण संघ अवघ्या 6 ओव्हरमध्ये तंबूत परतला. कानपुरच्या संघाने 74 धावा केल्या. यामध्ये कर्णधार समीर रिजवीने सर्वाधिक म्हणजेच 15 चेंडूंमध्ये 38 धावा केल्या. सौवर दुबेने 13 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला वैयक्तिक स्तरावर दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. एकंदरित या सामन्याचा अंतिम निकाल पाहता रिंकूची 22 धावांची खेळी फारच निर्णायक ठरल्याचं अधोरेखित झालं.