Rinku Singh: `आईने कर्ज काढून मला...`, टीम इंडियासाठी डेब्यू झाल्यावर रिंकू सिंह भावूक!
Rinku Singh Debut Match: दुसऱ्या सामन्यात रिंकू सिंहला संधी मिळणार आहे. अशातच डेब्यूनंतर कोणत्या भावना मनात होत्या? याची रोखठोक उत्तरं रिंकूने जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.
Rinku Singh Emotional On Debut: आयपीएलमधील दमदार प्रदर्शनानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) फलंदाज रिंकू सिंह (Rinku Singh) याच्यासाठी आता टीम इंडियाचे दरवाजे खुले झाले आहेत. रिंकू सिंह याने आयर्लंडविरुद्ध ( India vs Ireland ) डेब्यू सामना खेळला. मात्र, त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. पावसामुळे सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लागला. टीम इंडियाचा 2 धावांनी विजय मिळाला खरा पण रिंकू सिंगला फलंदाजीला उतरता आलं नाही. आता दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळणार आहे. अशातच डेब्यूनंतर कोणत्या भावना मनात होत्या? याची रोखठोक उत्तरं रिंकूने जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.
काय म्हणाला रिंकू सिंह?
माझी आई मला नेहमी म्हणायची तुला टीम इंडियासाठी खेळायचं असेल तर मेहनत कर. आज तिचं स्वप्न पूर्ण झालं. माझ्या करिअरमध्ये कुटुंबाने मला खूप मदत केली आहे. आमच्याकडे जेव्हा पैसे नव्हते तेव्हा आई मला कर्ज घेऊन मदत करत होती, असं म्हणताना रिंकू सिंह भावूक (Rinku Singh Emotional) झाल्याचं दिसून आलं. आज मी तो कोणी आहे, तो माझ्या कुटुंबामुळेच. माझ्या कुटुंबाला क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना गरिबीतून बाहेर काढायचं होतं. त्यातून मला प्रेरणा मिळत होतो आणि मी देखील त्यासाठी कठोर परिश्रम केले, असं रिंकू सिंह म्हणतो.
मी टीम इंडियात (Team India) सिलेक्ट होण्याचा पहिलं ध्येय साध्य केलं आहे. त्यामुळे आता मी माझ्या टीमसाठी 100 टक्के देण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येक सामना माझ्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे जेवढं शक्य असेल, तेवढं मी टीमसोबत राहण्याचा प्रयत्न करेल, असंही रिंकू सिंह म्हणाला आहे. पहिल्या सामन्यात त्याला मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला आता दुसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा - IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या बॉलिंग कोचपदी 'या' माजी स्टार खेळाडूची नियुक्ती!
दरम्यान, रिंकूने आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी सर्वाधिक 474 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याच्यासाठी टीम इंडियाची दरवाजे उघडे राहतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्ध रिंकू सिंहला संधी मिळाली नाही. त्यानंतर आता त्याला आयर्लंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर आगामी एशियन्स गेम्सच्या (Asians Games 2022) संघात देखील त्याला स्थान देण्यात आलंय.