Rinku Singh In Indian Test Team: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये दमदार विजय मिळवत मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवलं. मात्र भारतीय फलंदाजीमध्ये म्हणावा तितका दम दिसून आला नाही. कसोटी संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी रणजी ट्रॉफीची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रिंकू सिंहने आपल्या संघासाठी दमदार खेळी केली. मात्र या खेळीमुळे निवड समितीमधील निवडकर्त्यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. कसोटी संघामध्ये रिंकू सिंहला संधी देण्याचा विचार निवड समितीला नक्कीच करावा लागणार आहे.


कोणाची जागा घेणार रिंकू?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिंकू सिंह कसोटी संघामध्ये श्रेयस अय्यरची जागा घेऊ शकतो अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. मागील 5 कसोटी सामन्यामध्ये अय्यरला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. मागील 5 कसोटींमध्ये श्रेयसची सर्वोच्च धावसंख्या 31 राहिली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात या धावा केल्या होत्या. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांमध्येही श्रेयस खेळला होता. या सामन्यांमध्येही त्यांची कामगिरी फारशी प्रभावी ठरली नाही. या मालिकेतील त्याचा सर्वोच्च स्कोअर 26 इतका होता.


त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धही सुमार कामगिरी


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्येही अय्यरला फारसा प्रभाव पाडता आला नाही. पहिल्या कसोटीमधील पहिल्या डावात त्याने 31 तर दुसऱ्या डावात 6 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात अय्यरला भोपळाही फोडता आला नाही. पहिल्या डावात 0 तर दुसऱ्या डावात अय्यरला नाबाद 4 धावा करता आल्या. सातत्याने अपयशी ठरत असलेल्या अय्यरला कसोटी संघातून डच्चू मिळू शकतो. भविष्यात भारतीय संघामध्ये श्रेयसच्या जागी रिंकू सिंह दिसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रिंकू सध्या कसोटीमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. तर अय्यर 5 व्या क्रमांकावर भारतीय संघात फलंदाजी करतोय. मात्र टी-20 क्रिकेटप्रमाणे रिंकूला 5 व्या क्रमांकावर खेळवलं जाऊ शकतं.


टी-20 बरोबर रणजीमध्ये दमदार कामगिरी


रिंकू सिंहने रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी केरळविरुद्ध दमदार कामगिरी केली. रिंकून 103 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. रिंकूच्या खेळीन त्याच्या संघाला 244 धावांपर्यंत मजल मारता आली. रिंकू टी-20 मध्येही सातत्याने उत्तम कामगिरी करत आहे. त्यातच आता त्याने रणजीमधील कामगिरीने निवड समितीमधील अधिकाऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे भविष्यात रिंकू रेड बॉल क्रिकेटमध्ये भारतीय संघात दिसल्याच आश्चर्य वाटू नये.