मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १३७ रननी विजय झाला. याचबरोबर भारतानं ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये २-१नं आघाडी घेतली आहे. भारताचा टेस्ट क्रिकेट इतिहासातील हा १५०वा विजय आहे. एवढे विजय मिळवणारा भारत हा जगातला पाचवा देश बनला आहे. फास्ट बॉलर ईशांत शर्माच्या बॉलिंगवर नॅथन लायननं विकेट कीपर ऋषभ पंतला कॅच दिला आणि भारतानं विजय मिळवला. या कॅचसोबतच पंत एका सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय विकेट कीपर ठरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ पंतनं ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमधल्या ३ मॅचमध्येच २० विकेट घेतल्या आहेत. पंतनं नरेंद्र ताम्हाणे आणि सैय्यद किरमाणी यांचं रेकॉर्ड मोडलं आहे. या दोघांनी १९-१९ विकेट घेतल्या होत्या. ताम्हाणे यांनी पाकिस्तानविरुद्ध १९५४-५५ साली ५ मॅचमध्ये आणि किरमाणी यांनीही पाकिस्तानविरुद्धच १९७९-८० साली ६ टेस्टमध्ये हे रेकॉर्ड केलं होतं.


भारताचा १५०वा विजय


भारताचा ५३२ टेस्टमधला हा १५०वा विजय आहे. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया (३८४), इंग्लंड(३६४), वेस्ट इंडिज (१७१) आणि दक्षिण आफ्रिकेनं (१६२) यापेक्षा जास्त विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाचा टेस्ट क्रिकेटमधला हा २२२ वा पराभव होता. सर्वाधिक पराभवाच्या बाबतीत इंग्लंड ऑस्ट्रेलियाच्या पुढे आहे. इंग्लंडच्या नावावर २९८ पराभव आहेत.


विराटच्या नेतृत्वात २६वा विजय


विराट कोहलीनं ४५ मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं यातल्या २६ मॅचमध्ये भारताचा विजय झाला. धोनी हा भारताकडून सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं ६०पैकी २७ मॅचमध्ये विजय मिळवला. हे रेकॉर्ड मोडण्यासाठी विराटला आता फक्त २ विजयांची आवश्यकता आहे.


कोहलीच्या नेतृत्वात परदेशात भारताचा हा ११वा विजय आहे. याचबरोबर कोहलीनं गांगुलीच्या रेकॉर्डचीही बरोबरी केली. गांगुलीनंही परदेशामध्ये ११ टेस्ट जिंकल्या होत्या. गांगुलीच्या नेतृत्वात भारतानं ४९ टेस्ट खेळल्या, यामध्ये भारतानं २१ विजय मिळवले.