Rishabh Pant Latest Health Update : शुक्रवारी पहाटे भीषण अपघातात भारताचा स्टार फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत हा गंभीर जखमी झाला होता. सुदैवाने तो या अपघातातून बचावला आहे. वेगात असलेल्या पंतच्या (Rishabh Pant Car Accident) कारने दुभाजकाला धडक दिल्यानंतर गाडीने पेट घेतला होता. त्यानंतर आता गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अपघातानंतर पंतच्या कपाळावर दोन जखमा झाल्या आहेत. त्यातील एक डाव्या डोळ्याच्या वर आहे. यासोबतच त्याच्या गुडघ्यालाही दुखापत झाली. तसेच गाडीतून बाहेर पडताना त्यांच्या पाठीलाही काही जखमा झाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर आता काही चाचण्यांनंतर पंतच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ऋषभ पंतच्या मणक्याचे आणि मेंदूचे सीटी स्कॅन आणि एमआरआय रिपोर्ट हे नॉर्मल आले आहेत. त्यामुळे या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली नसावी, ही भीती आता दूर झाली आहे. सूज आल्यामुळे पंतच्या घोट्याचा आणि गुडघ्याचा एमआरआय आज करण्यात येणार आहे.


माध्यमांच्या वृत्तानुसार, ऋषभच्या घोट्याला, टाचांना आणि गुडघ्यांना दुखापत झाली आहे. त्यावरही उपचार सुरु आहेत. चाचण्यांनुसार पंतच्या हाडांवर कोणतेही मोठे फ्रॅक्चर झालेले नाही. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभची प्रकृती  स्थिर आहे. पायाचे घोटे आणि गुडघ्याला झालेल्या जखमेमुळे त्याला त्रास होत आहे. कंबर व डोके व डोळ्यांखाली जखमा झाल्यामुळेही वेदना होतात. 


पंतला दिल्लीला हलवलं जाण्याची शक्यता


ऋषभ पंतच्या प्रकृतीवर बीसीसीआय सातत्याने लक्ष ठेवून आहे. दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे (DDCA) संचालक श्याम शर्मा यांनी पंतच्या उपचाराबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. "पंतच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे पथक देहरादून मॅक्स हॉस्पिटलमध्ये जात आहे. गरज पडल्यास आम्ही त्याला दिल्लीला हलवू. तसेच बहुधा प्लास्टिक सर्जरीसाठी त्याला दिल्लीला नेण्यात येऊ शकते," असे शर्मा यांनी म्हटले आहे.



दरम्यान, ऋषभ पंतला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी किमान 6 महिने लागू शकतात. पंत दुबईहून परतला होता आणि त्याने आपल्या आईला सरप्राईज देण्याची योजना आखली होती. याच कारणामुळे तो कारने दिल्लीहून रुरकीला जात होता. मात्र कार दुभाजकाला धडकल्याने त्याचा अपघात झाला.