अटक वॉरंटवर रॉबिन उथप्पाची पहिली रिऍक्शन, फसवणुकीच्या आरोपांबाबत नेमकं काय म्हणाला?
Robin Uthappa Reaction On Arrest Warrant : 39 वर्षीय माजी फलंदाज रॉबिन उथप्पावर कर्मचाऱ्यांच्या प्रोविडेंट फंडचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मात्र आता यावर उथप्पायाने आपली बाजू मांडली आहे
Robin Uthappa Reaction On Arrest Warrant : भारताचा माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची बातमी शनिवारी येऊन धडकली. ज्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली. 39 वर्षीय माजी फलंदाजावर कर्मचाऱ्यांच्या प्रोविडेंट फंडचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. हे वॉरंट क्षेत्रीय पीएफ आयुक्त सदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केलं असून पुलकेशिनगर पोलिसांना आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र आता यावर रॉबिन उथप्पायाने आपली बाजू मांडली आहे.
काय म्हणाला रॉबिन उथप्पा?
सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित प्रकरणावर रॉबिन उथप्पा याने स्पष्टीकरण दिलं आहे. रॉबिन उथप्पाने त्याच्या एक्स अकाउंटवर एक स्टेटमेंट जाहीर केलं ज्यात त्याने सांगितले की, 2018-19 मध्ये, त्याने स्ट्रॉबेरी लेन्सरिया प्रायव्हेट लिमिटेड, सेंच्युरी लाईफस्टाईल ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बॅरीच्या फॅशन हाउसमध्ये आर्थिक साहाय्य केल्याने त्याची कंपन्यांच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती. उथप्पाने ही रक्कम या कंपन्यांना लोन म्हणून दिली होती, तसेच त्याने सांगितले की कंपनीत दररोज होणाऱ्या कामांशी त्याचा काहीही संबंध नव्हता. तसेच उथप्पाने सांगितले की, आजपर्यंत त्याने ज्या कंपनीत पैसे गुंतवले आहेत त्यापैकी कोणत्याही कंपनीत त्याला कार्यकारी भूमिका मिळालेली नव्हती.
मला पैसे परत मिळालेले नाहीत :
माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पाने संबंधित कंपन्यांना दिलेल्या कर्जाचा संदर्भ देत सांगितले की, "दुर्दैवाने ज्या कंपन्यांना मी कर्ज दिले त्यांनी मला माझे पैसे परत दिलेले नाहीत. त्यामुळे मला कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारावा लागला." तसेच या कंपन्यांच्या संचालक पदाचा राजीनामा मी फार पूर्वीच दिलेला होता. उथप्पा पुढे म्हणाला की, "जेव्हा पीएफ अधिकाऱ्यांनी माझ्याकडून कर्मचाऱ्यांचे पैसे परत मागितले तेव्हा माझ्या कायदेशीविषयक टीमने त्या नोटिशीला उत्तर देऊन संबंधित घोटाळा झालेल्या कंपन्यांमध्ये माझी कोणतीही भूमिका नाही हे कागदपत्रांसह स्पष्ट केले होते. तसेच या कंपन्यांनी देखील त्यांच्या कंपनीत माझी भागीदारी नसल्याचे सांगितले होते". रॉबिन उथप्पाचं म्हणणं आहे की इतकं सगळं स्पष्ट सांगूनही पीएफ अधिकाऱ्यांनी माझ्यावर कारवाई करण्यासाठी अटक वॉरंट पाठवले. उथप्पा म्हणाला की आता त्याची कायदेशीविषयक टीम संबंधित विषयावर महत्वाची पावलं उचलतेय.
हेही वाचा : चौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्माबाबत आली वाईट बातमी
काय आहे नेमकं प्रकरण?
माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पा 'सेंचुरीज लाइफस्टाइल ब्रांड प्राइवेट लिमिटेड' ही कंपनी सांभाळत होता. त्याच्यावर आरोप आहे की त्याने कर्मचाऱ्यांच्या खात्यातून पीएफची रक्कम कापली परंतु ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा केलीच नाही. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रॉबिन उथप्पावर एकूण 23 लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पीएफ आयुक्तसदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी 4 डिसेंबर रोजी एक पत्र पुलकेशिनगर पोलिसांना लिहिलं होतं. ज्यात उथप्पा विरोधात वॉरंट जरी करून त्याला अटक करण्यात यावे असे निर्देश दिले होते. परंतु पोलिसांनी हे वॉरंट पीएफ कार्यालयाला हे कारण सांगून परत दिलं की रॉबिन उथप्पाने त्याच राहण्याचं ठिकाण बदललं आहे.