मुंबई : टीम इंडियाच्या नजरा सध्या 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपवर आहेत. कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम सध्या झिम्बाब्वेमध्ये वनडे मालिका खेळतेय. तर आगामी आशिया कप नियमित कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला खेळायचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मासह अनेक खेळाडू विश्रांती घेत असून ते थेट आशिया कपमध्ये खेळणार आहेत. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत पहिल्यांदाच आशिया चषक खेळणार असून आता त्यांनी या स्पर्धेसाठी रणशिंग फुंकलं आहे. दरम्यान रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सला मुलाखत दिलीये, ज्यामध्ये त्याने आपली रणनीती सांगितली आहे.


कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, आम्ही मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियासोबत आतापर्यंत जे काही केलं आहे, तेच ध्येय घेऊन आम्ही पुढे जाऊ. फक्त गोष्टी साध्या आणि स्पष्ट ठेवा. शिवाय खेळाडूंना सांगणार आहोत की, त्यांनी त्यांची भूमिका बजावली आहे.


रोहित शर्मा पुढे म्हणाला, मी आणि राहुल भाई एकत्र फोकस ठेवणार आहोत. आम्ही गोष्टींची गुंतागुंती करणार नाही आणि आमच्या योजनेवर सोप्या पद्धतीने काम करू.


रोहित शर्मा सध्या टीम इंडियाचा नियमित कर्णधार आहे, त्याच्यासमोर अनेक मोठी आव्हानं आहेत. आशिया चषक, टी-20 विश्वचषक आणि त्यानंतर वनडे विश्वचषकही टीम इंडियासमोर आहे, अशा स्थितीत प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत तो रणनीती आखत असून या खडतर आव्हानांना तो सामोरा जाणार आहे.