Rohit Sharma Sixes vs Starc : सेंट लुसिया मैदानावर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुपर 8 चा सामना सुरु आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत असून रोहित शर्माने कांगारूंच्या गोलंदाजांचा वपचा काढला आहे. मैदानावर रोहित शर्माच्या बॅटमधून केवळ चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत होता. मिचेल स्टार्क, पॅट कमिंस या सर्व गोलंदांजांना रोहित शर्माने चांगलाच चोप दिला. मात्र अवघ्या 8 रन्सने हिटमॅनचं शतक हुकलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 वर्ल्डकप सुपर-8 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला. डावातील तिसरी ओव्हर टाकण्यास आलेल्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मिचेल स्टार्कला हिटमॅनने अक्षरशः धु-धु धुतलं. परिस्थिती अशी होती की, गोलंदाजाला त्याचा चेहरा लपवावा लागला. 


ऑस्ट्रेलियासमोर हिटमॅनचं रौद्र रूप


विराट कोहलीसोबत ओपनिंगला आलेल्या रोहित शर्माने पहिल्या दोन ओव्हर सावध पद्धतीने खेळल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये विराट कोहलीच्या रूपाने भारताला मोठा धक्का बसला. पण त्याचा रोहित शर्मावर काहीही परिणाम झाला नाही. तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या मिचेल स्टार्कच्या सलग चेंडूंवर त्याने षटकार मारण्यास सुरुवात केली. रोहितने पहिल्या दोन बॉल्सवर षटकार ठोकले. तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. चौथ्या चेंडूवर रोहितने पुन्हा मोठा फटका मारत चेंडू बाऊंड्री पार नेला. ओव्हरमधील हा तिसरा षटकार होता. 


यानंतरही रोहित थांबला नाही, तर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरही त्याने मिचेल स्टार्कला सिक्स लगावली. षटकारांचा वर्षाव करताना रोहितने षटकात एकूण 28 रन्स केले. त्याच वेळी ओव्हरमध्ये 1 वाईडसह 29 रन्स भारताला मिळाले.


19 बॉल्समध्ये केलं अर्धशतक पूर्ण


या सामन्यात रोहित शर्माचा भन्नाट फॉर्म पाहायला मिळाला. हिटमॅनने अवघ्या 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 2024 च्या T20 वर्ल्डकपमधील हे सर्वात जलद अर्धशतकही ठरलं. यासह रोहित शर्मा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा 5वा भारतीय फलंदाज ठरला. युवराज सिंग (12 चेंडू) अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर केएल राहुल (18 चेंडू) आणि सूर्यकुमार यादव (18 चेंडू) दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. तर गौतम गंभीर (19 चेंडू) पाचव्या क्रमांकावर आहे.


टी-20 इंटरनॅशनलमध्ये पूर्ण केले 200 षटकार


आजच्या सामन्यातील फलंदाजीने हिटमॅननचे चाहते खूश आहेत. रोहित शर्माने स्फोटक फलंदाजी करताना T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 षटकारही पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका टीमविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे.