Rohit Sharma On India 2nd ODI Loss To Sri Lanka: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमधील दुसऱ्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 32 धावांनी झालेला हा पराभव जिव्हारी लागणारा असल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे. रविवारी झालेल्या या सामन्यामध्ये मधल्या फळीमधील फलंदाजांच्या कामगिरीबद्दल आपण चर्चा करणार असल्याचं रोहित शर्माने सांगितलं. जेफरी वेंडरसेने 33 धावांमध्ये भारताच्या 6 गड्यांना बाद केल्याने भारताच्या डावाला घसरण लागली आणि बीनबाद 97 वरुन भारताचा डाव 208 वर आटोपला. फिरकी गोलंदाजीविरुद्ध भारतीय संघ किती कमकुवत आहे हे पुन्हा या सामन्यामधून अधोरेखित झालं.


खेळाबद्दल फारसं खोलात जाणार नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"तुम्ही जेव्हा पराभूत होता तेव्हा सारं काही तुमच्या जिव्हारी लागतं. हा पराभव केवळ त्या 10 ओव्हरमधला नाही. (भारताने मधल्या दहा ओव्हरमध्ये 50 धावांच्या मोबदल्यात 6 गडी गमावले.) तुम्ही सातत्यपूर्ण क्रिकेट खेळणं अपेक्षित आहे. आम्ही यामध्ये अपयशी ठरलो आहोत. थोडा निराश आहे मी मात्र या गोष्टी घडत असतात," असं रोहितने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये म्हटलं आहे. "आम्ही म्हणावं तितकं चांगलं खेळलो नाही. आम्ही कसं खेळलो याबद्दल फारसं खोलात जाऊन विश्लेषण करण्याची गरज वाटत नाही. मात्र मधल्या षटकांमध्ये आमच्या फलंदाजांच्या कामगिरीबद्दल नक्कीच टीम मिटींगमध्ये चर्चा होईल," असं रोहित म्हणाला.


भारताचं काय चुकलं? रोहित म्हणाला...


भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेतील खेळपट्ट्यांशी जुळून घेण्याची गरज असल्याचं रोहितने स्पष्टपणे सांगितलं. तसेच फलंदाजीमध्ये भारतीय संघाचा अंदाज कुठे चुकला याबद्दलही रोहितने भाष्य केलं. "तुमच्यासमोर जे काही असेल त्याच्याशी तुम्ही क्रिकेटपटू म्हणून जुळवून घेतलं पाहिजे. डावखुरे आणि उजव्या हाताच्या फलंदाजांच्या जोड्यांबरोबर स्ट्राइक रोटेट करणं शक्य होईल, असं आम्हाला वाटलं होतं. मात्र जेफरीला सर्व श्रेय दिलं पाहिजे. त्याने सहा विकेट्स घेतल्या," असं रोहित म्हणाला. या दुसऱ्या सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर भारतीय संघ मालिकेमध्ये 1-0 ने पिछाडीवर पडल्यानंतरही भारतीय संघाच्या भूमिकेमध्ये काहीही बदल होणार नसल्याचं रोहितने स्पष्ट केलं आहे. 


नक्की वाचा >> कोहलीमुळे मैदानात 'विराट' राडा! हेल्मेट आपटलं; जयसूर्यानेही श्रीलंकन ड्रेसिंग रुममधून...


श्रीलंकन कर्णधार काय म्हणाला?


मैदानाबरोबरच खेळपट्टीची जी स्थिती होती ती पाहता आम्ही केलेला 240 धावांचा स्कोअर हा फारच उत्तम होता असं सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार चरिथा असलंका म्हणाला. "मी आमच्या धावसंख्येनं समाधानी होतो. 240 ही चांगली धावंसख्या होती. कर्णधार म्हणून मला अशी आव्हानं आवडतात. आमच्याकडे फिरकी गोलंदाजांचे अनेक पर्याय होते. त्याने (विंदिसेने) केलेली गोलंदाजी फारच उत्तम होती," असं असलंका म्हणाला.