T20 World Cup : ...नाहीतर वर्ल्डकप विसरा! कर्णधार Rohit Sharma ला चॅलेंज
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहालीत होणार आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट टीम आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सिरीज खेळणार आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहालीत होणार आहे. अनुभवी सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम ही मालिका जिंकून आगामी T20 वर्ल्डकपची तयारी मजबूत करू इच्छितो. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने कर्णधार रोहितला थेट आव्हान दिलंय.
'ऑस्ट्रेलियाला हरवणं आवश्यक'
गौतम गंभीरने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला आव्हान दिलं आहे. आगामी टी-20 मालिकेत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला हरवू शकली नाही, तर वर्ल्ड कप जिंकणं त्यांच्यासाठी कठीण जाईल, असं त्याने म्हटलंय.
स्टार स्पोर्ट्सवर गंभीर म्हणाला, "मी हे आधीही बोललो आहे आणि पुन्हा सांगतोय. आगामी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला हरवलं नाही तर टी-20 वर्ल्डकप जिंकता येणार नाही."
गंभीरच्या मते, ऑस्ट्रेलियाला हरवल्याने टीमचा आत्मविश्वास वाढतो. गंभीर म्हणाला, 'म्हणजे 2007 च्या टी-20 वर्ल्डकपकडे बघा, आम्ही त्यांना उपांत्य फेरीत पराभूत केलं. 2011 च्या एकदिवसीय वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याचा पराभव झाला होता. ऑस्ट्रेलिया हा सर्वात प्रतिस्पर्धी टीमपैकी एक आहे आणि जर तुम्हाला एखादी स्पर्धा जिंकायची असेल तर तुम्हाला त्यांना पराभूत करावं लागेल."
टीम इंडिया आणि त्याचे चाहते गेल्या 15 वर्षांपासून टी-20 वर्ल्ड ट्रॉफीची वाट पाहतायत. 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच T20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर भारताला एकदाही ही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. विशेष बाब म्हणजे गौतम गंभीर 2007 टी-20 विश्वविजेत्या टीमचा सदस्य होता. या सामन्यात सलामीवीर म्हणून त्याने 75 रन्सची शानदार खेळीही खेळली होती.