India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंडमध्ये सध्या पुण्यात  दुसरी कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं. रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर डेवॉन कॉन्वे (Devon Conway) खेळत असताना डीआरएस घ्यायचा की नाही यासंदर्भात चर्चा सुरु होती. यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं मत एकमेकांच्या अगदी विरोधात होतं. विराट कोहलीने रवींद्र जाडेजाला डीआरएस घेऊ नये यासाठी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण रोहित शर्माने त्याचं न ऐकता डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. याची किंमत भारतीय संघाला मोजावी लागली, कारण विराटचं म्हणणं योग्य ठरलं. अम्पायर्सनी आपला निर्णय कायम ठेवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या डावातील 25 व्या ओव्हरमध्ये हे सगळं घडलं. आर अश्विनने वील यंगला बाद केल्यानंतर रवींद्र जाडेजा गोलंदाजीसाठी आला होता. त्याने कॉन्वेला चेंडू टाकल्यानंतर सर्वांनी पायचीत झाल्याबद्दल अपील केली. पण चेंडू फार वळत असल्याने अम्पायरने नॉट आऊट दिलं. पण तिथे जवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंचं मत वेगळं होतं. खासकरुन सरफऱाज खान आणि ऋषभ पंत ज्यांनी यंगच्या विकेटमध्ये मोलाची भूमिका निभावली होती. 


या सर्व खेळाडूंमध्ये फक्त विराट कोहलीचं मत वेगळं होतं. चेंडू स्टम्पवर जात नसल्याची विराट कोहलीला खात्री होती. विराट कोहली रोहित शर्माकडे डीआरएसबद्दल बोलण्यासाठी गेला होता. पण तोपर्यंत रोहित शर्माने निर्णय घेतला होता. त्याने अम्पायरला डीआरएससाठी इशारा दिला. पण अखेर हा रिव्ह्यू वाया गेला. समालोचन करणाऱ्या सायमन यांनीही 'रोहित, कम ऑन. घेऊ नकोस, पाय मिस होतोय', असं सांगत रोखण्याचा प्रयत्न केला. पण हा आवाज काही रोहितपर्यंत जाण्याचा संबंधच नव्हता. 


भारताने जेव्हा डीआरएस घेतला होता, तेव्हा कॉनवे 38 धावांवर होता. यानंतर त्याने अर्धशतक केलं. त्याने 11 चौकार लगावले आणि 141 चेंडूत 76 धावा केल्या. अखेर आर अश्विनने त्याला बाद केलं. न्यूझीलंड संघ भक्कम स्थितीत होता. मात्र यानंतर वॉशिंग्टन सुंदरने जबरदस्त गोलंदाजी करत न्यूझीलंड संघाला 259 धावांवर रोखलं. वॉशिंग्टन सुंदरने एकूण 7 विकेट घेतल्या आणि न्यूझीलंडचा अख्खा संघ तंबूत धाडला. 


न्यूझीलंड विरुद्ध गोलंदाजी करताना आर अश्विनने प्रथम 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजीत आपला प्रभाव पडला. सुंदरने एका मागोमाग एक 7 विकेट्स घेऊन न्यूझीलंडच्या अर्ध्याहून अधिक टीमला लोळवलं. वॉशिंग्टन सुंदरने पहिले रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल यांना बाद केले. वॉशिंग्टन सुंदरने  एक तब्बल 7 विकेट्स घेतल्या आणि यामुळेच न्यूझीलंडला 259 धावांवर रोखणं टीम इंडियाला शक्य झालं.