Rohit Sharma Old Tweet For Shubman Gill: भारताचा तरुण फलंदाज इशान किशनने (Ishan Kishan) एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावल्यानंतर महिन्याभराच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा शुभमन गिलच्या (Shubman Gill) रुपाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नवा द्विशतकवीर लाभला आहे. न्यूझीलंडविरुद्ध (India Vs New Zealand ODI Series) सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात शुभमने हैदराबादच्या मैदानावर 208 धावांची (Shubman Gill Double Century) खेळी केली. बुधवारी झालेल्या सामन्यात शुभमने केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीसहीत मानाच्या पंक्तीमध्ये स्थान मिळवलं आहे. गिल हा पाचवा भारतीय ठरला आहे ज्याने एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावलं आहे. अशाप्रकारे द्विशतक झळकावण्याचा पराक्रम रोहित शर्माने (Rohit Sharma) एकदा नाही तर तिनदा केला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित हा एकमेव खेळाडू आहे. मात्र शुभमनच्या द्विशतकानंतर रोहित शर्माचं एक दोन वर्षांपूर्वीच ट्वीट पुन्हा व्हायरल झालं आहे. सध्याच्या घडीला हे ट्वीट भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधत असून हे ट्वीट अगदीच योग्य असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.


गिलची भन्नाट कामगिरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी गिलने द्विशतक झळकावत सर्वात कमी वयामध्ये ही कामगिरी करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. जवळजवळ महिन्याभरापूर्वीच हा विक्रम इशानने आपल्या नावे केला होता. अशाप्रकारे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात आधी द्विशतक झळकावण्याचा पराक्रम सचिन तेंडुलकरने केला होता. त्यानंतर 2013 साली पहिल्यांदा 156 चेडूंमध्ये ऑस्ट्रेलियावरुद्धच्या सामन्यात रोहितने द्विशतक झळकावलं होतं. त्यानंतर रोहितने 2014 आणि 2017 साली  पुन्हा हा पराक्रम करुन दाखवला होता.


अनेकांनी म्हटलं शुभमन संभाळणार जागा


रोहितने एकदा दोनदा नाही तर तीनवेळा द्विशतक झळकावल्याने त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याच्या बाबतीत तो सर्वात अनुभवी खेळाडू आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. सध्या शुभमनच्या द्विशतकानंतर रोहितचं एक ट्वीट व्हायरल झालं असून त्याचा संबंध शुभमनच्या कामगिरीशी जोडला जात आहे. शुभमनची इनिंग पाहून अनेकांनी सचिननंतर ज्याप्रमाणे रोहित आणि कोहली आले त्याप्रमाणे या दोघांनंतर शुभमन आणि इशानसारखे खेळाडू त्यांची जागा चालवतील असं चित्र दिसत असल्याच्या भावना सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या आहेत. याचसंदर्भातून रोहितचं जुनं ट्वीट व्हायरल होत आहे.


रोहितचं ते ट्वीट व्हायरल


30 एप्रिल 2020 रोजी रोहितला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शुभमन गिलने हिटमॅन रोहित शर्मासारखे पूल शॉट कोणीच मारु शकत नाही, असं म्हणत रोहितला टॅग करुन शुभेच्छा देणारं ट्वीट केलेलं. शुभमनच्या या ट्वीटला रोहितने "थँक्स फ्युचर" असं म्हणत डोळा मारण्याच्या इमोजीसहीत उत्तर दिलेलं. म्हणजेच तुझ्यामध्ये मला भविष्य दिसत आहे असं रोहितला यामधून सुचित करायचं होतं. आता शुभमनच्या द्विशतकानंतर रोहितचं हे जवळजवळ तीन वर्षांपूर्वीचं ट्वीट चर्चेत आलं आहे. अनेकांनी या ट्विटवरुन रोहितला आधीच शुभमन हा उत्तम खेळाडू असेल आणि तो भविष्यात आपल्यासारखीच कामगिरी करेल याची खात्री वाटत होती असं म्हटलं आहे. तर काहींनी या द्विशतकाबद्दल रोहितला आधीच कल्पना होती की काय अशी मजेशीर शंका 'फ्युचर' या शब्दामुळे व्यक्त केली आहे.



"आमचा सेकेण्ड बेस्ट स्कोअर 34 होता यावरुनच..."


दरम्यान, रोहितने पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर शुभमनच्या द्विशतकाबद्दल बोलताना शुभमनचं कौतुक केलं होतं. "त्याने ज्याप्रकारे खेळी साकारली ते फारच कौतुकास्पद आहे कारण एकीकडे आम्ही सातत्याने विकेट्स गमावत होतो. एकीकडे विकेट्स पडत असताना सेट बॅट्समनला त्याच वेगाने धावा जमवणं सोपं काम नसतं," असं रोहितने म्हटलं. "शुभमनच्या धावसंख्येनंतरची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या 34 होती यावरुनच तो किती छान खेळला आहे हे दिसतं," असं रोहित म्हणाला.