मुंबई : मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्याच्या वेळी चाहत्यांचा हिरमोड होताना दिसतोय. यंदाचा सिझन हा मुंबई इंडियन्ससाठी जणू एक वाईट स्वप्नच आहे. सहा सामने झाले असून एकाही सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाही. काल झालेल्या लखनऊ सुपर जाएंट्सविरूद्धच्या सामन्यात 18 रन्सने पराभव झाल्याने हा मुंबईचा सलग सहावा पराभव ठरला आहे. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, "आम्ही एक चांगली पार्टनरशिप नाही करू शकलो. ज्याची किंमत आम्हाला मोजावी लागली. काहीवेळा विरोधी टीम चांगली खेळली हे तुम्ही स्विकारलं पाहिजे. राहुलने त्याच्या टीमसाठी असचं काही केलं. जर मला माहिती असतं चूक कुठे होतेय तर मी निश्चित ती सुधारली असती."


सध्याच्या परिस्थितीत कोणतीच गोष्ट आमच्या बाजूने होत नाहीये. पण, मी याची जबाबदारी माझ्यावर घेतो. मी माझ्या अनुभवाचा पूर्ण उपयोग करेन आणि मला आशा आहे की, टीम म्हणून आम्ही लवकरच कमबॅक करू, असंही रोहितने सांगितलं आहे.


प्रथम फलंदाजी करत लखनऊने मुंबईला विजयासाठी 200 रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 181 धावांपर्यंतच मजल मारता आली. 


मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 37 धावांची खेळी केली. डेवाल्ड ब्रेविसने 31 धावा जोडल्या. टिळक वर्माने 26 धावांचं योगदान दिलं. कायरन पोलार्डने  25 रन्स केल्या.  तर कॅप्टन रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामी जोडीने निराशा केली.