मुंबई : आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये हैदराबाद आणि चेन्नईनं प्रवेश केला आहे. तर दिल्लीसोडून उरलेल्या पाचही टीम प्ले ऑफच्या शर्यतीमध्ये कायम आहेत. मागच्या वर्षी आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईची कामगिरी यावर्षी निराशाजनक झाली आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या १२ मॅचपैकी मुंबईचा ५ मॅचमध्ये विजय आणि ७ मॅचमध्ये पराभव झाला आहे. १० पॉईंट्ससह मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंतच्या १० आयपीएलमध्ये मुंबईनं सर्वाधिक ३ वेळा आयपीएल जिंकली आहे. या तिन्हीवेळा रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार होता. यावर्षी मात्र रोहितची बॅट अजूनही तळपलेली नाही. १२ मॅच खेळणाऱ्या रोहितनं २६.७०च्या सरासरी आणि १३७.६२च्या स्ट्राईक रेटनं २६७ रन बनवल्या आहेत. याचबरोबर रोहितनं या मोसमात एक लाजीरवाणं रेकॉर्डही स्वत:च्या नावावर केलं आहे.


रोहितचं लाजीरवाणं रेकॉर्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं करणाऱ्या रोहितनं आयपीएलच्या १० वर्षांमधलं खराब रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं आहे. या आयपीएलमध्ये रोहित शर्मा ३ वेळा पहिल्या बॉलवर झाला आहे. आयपीएलच्या याआधीच्या १० मोसमांमध्ये रोहित शर्मा कधीच पहिल्या बॉलवर आऊट झाला नव्हता. आयपीएलच्या इतिहासामध्ये रोहित शर्मा ७ वेळा शून्यवर आऊट झाला आहे. यापैकी तीन वेळा तर याच मोसमात तो शून्यवर आऊट झाला. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यवर आऊट होण्याचं रेकॉर्ड गौतम गंभीरच्या नावावर आहे. गंभीर १०वेळा शून्यवर आऊट झाला आहे.


रोहितची ईशान किशनच्या रेकॉर्डशी बरोबरी


आयपीएलच्या या मोसमात शून्यवर आऊट होण्याच्या बाबतीत रोहितनं त्याच्याच टीममधला सहकारी इशान किशनशी बरोबरी केली आहे. रोहितबरोबरच ईशान किशनही यावर्षी ३ वेळा शून्यवर आऊट झाला आहे.


रोहितची प्रतिक्रिया


आम्हाला या पिचवर १५-२० धावा अधिक बनवायला हव्या होत्या. आधीच्या सामन्यात आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. आजच्याही सामन्यात आम्ही चांगली कामगिरी केली नाही. मात्र मी त्याबाबत अधिक निराश नाहीये. कारण आम्ही चांगले क्रिकेट खेळतोय. काही ठिकाणी आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. पुढच्या दोन सामन्यांत आम्हाला मनोबल कायम ठेवण्याची गरज आहे. आव्हानाचा पाठलाग करणे सोपे नाही. मात्र हा आमच्यासाठी बहाणा नाही, असं रोहित म्हणाला.