मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडेन १८ रननी पराभव झाला. यामुळे वर्ल्ड कप जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंगलं. वर्ल्ड कपमध्ये पराभव झाल्यानंतर आता रोहित शर्माकडे वनडे आणि टी-२० टीमचं नेतृत्व द्यावं, अशी मागणी वसीम जाफरने केली आहे. भारताचा माजी टेस्ट क्रिकेटपटू वसीम जाफरने ट्विट करून ही मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रोहित शर्माला वनडे आणि टी-२० टीमचा कर्णधार बनवण्याची ही योग्य वेळ आहे का? २०२३ सालच्या वर्ल्ड कपमध्ये रोहितने टीम इंडियाचं नेतृत्व करावं, अशी माझी इच्छा आहे,' असं ट्विट वसीम जाफरने केलं आहे.



वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर रोहितला कर्णधार बनवण्यात यावं, अशी मागणी काही क्रिकेट रसिकांनी केली आहे. विराटच्या अनुपस्थितीमध्ये रोहितने टीम इंडियाचं कर्णधारपद भुषवलं आहे. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. मागच्यावर्षी झालेल्या आशिया कपमध्येही टीम इंडियाचा रोहितच्या नेतृत्वात विजय झाला होता.


आयपीएलमध्येही रोहितच्या नेतृत्वात मुंबईने सर्वाधिक ४ वेळा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली. एवढ्यावेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा हा विक्रम आहे. तर विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूला अजून एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही.


वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया अजून इंग्लंडमध्येच आहे, पण रोहित शर्मा मात्र भारतात परतला आहे. १३ जुलैला रोहित मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी रोहितसोबत त्याची पत्नी रितिका सजदेह, मुलगी समायरा आणि कुटुंबातले इतर सदस्य होते. रोहित स्वत: गाडी चालवून घरी परतला.


वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर टीम इंडिया मॅनचेस्टरमध्येच आहे. तिकीट मिळालया उशीर होत असल्यामुळे टीम इंडिया मॅनचेस्टरमध्येच अडकली आहे. खेळाडूंची भारतात परतण्याची तिकीट बूक करण्यात आली आहेत. रविवार १४ जुलैपर्यंत खेळाडू मॅनचेस्टरमध्येच असतील.


या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने सर्वाधिक ६४८ रनचं रेकॉर्ड केलं. एकाच वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ५ शतकं करण्याचा विक्रमही रोहितने केला. याआधी हे रेकॉर्ड श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर होता. संगकाराने २०१५ वर्ल्ड कप ४ शतकं केली होती.