Rohit Sharma: टीम इंडिया सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यावेळी रविवारी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना रंगला होता. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा 32 रन्सने दारूण पराभव झाला. टीम इंडियाचे ओपनर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीमला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र असं असूनही उर्वरित फलंदाजांना साजेसा खेळ करता आला नाही आणि टीमचा पराभव झाला. दरम्यान सामन्यात पुन्हा एकदा रोहित शर्माची बॅट तळपली आणि त्याने 64 रन्सची खेळी केली.  


रोहित शर्माची कॅप्टन्स इनिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेच्या टीमने पहिली फलंदाजी करत 240 रन्स केले. 241 रन्सच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने स्फोटक सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांची जोरदार मुसंडी मारली. पॉवरप्लेनंतरच भारताचा स्कोर 76 झाला. रोहितने अवघ्या 29 बॉल्समध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. पहिल्या सामन्यातही रोहितने टीमला अशीच सुरुवात करून दिली होती. त्याने 33 बॉल्समध्ये अर्धशतक केलं. दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या कर्णधाराने पॉवरप्लेमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. रोहितने 44 चेंडूत 64 धावांची खेळी खेळली.


दुसऱ्या पीचवर खेळतायत बाकी फलंदाज?


पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यातही रोहित शर्मा बाद झाल्याने भारताची फलंदाजी गडगडली. जणू काही दुसऱ्याच पीचवर रोहित फलंदाजी करत होता, असं दिसत होतं. दुसऱ्या वनडेत रोहित शर्मा बाद झाला तेव्हा भारताचा स्कोर 97 रन्स होती. पुढील 50 रन्समध्ये रन्समध्ये आणखी 5 विकेट पडल्या. प्रत्येक फलंदाज पीच बदलल्याप्रमाणे आऊट होत होता. रोहित सहज फटके खेळत असताना इतर फलंदाज कसे खेळू शकले नाहीत हा प्रश्न सर्वांसमोर आहे. 


दुसऱ्या वनडे सामन्यात नेमकं काय घडलं?


लेगस्पिनर जेफ्री वंडरसेच्या सहा विकेट्सच्या जोरावर श्रीलंकेने दुसरी वनडे 32 रन्सने जिंकला. वॉशिंग्टन सुंदरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या स्पिनर्सने चांगली कामगिरी केली. यावेळी श्रीलंकेच्या फलंदाजांना काहीसा सामना कठीण झाला होता. पण खालच्या फळीतील फलंदाजांमुळे श्रीलंकेच्या टीमने 9 विकेट्स गमावत 240 रन्स केले. स्पिनर्सना अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर हे लक्ष्य भारतासाठी डोंगरासारखं झालं आणि संपूर्ण संघ 208 रन्सवर गारद झाला.