मुंबई : श्रीलंकेच्या टीमने आशिया कप-2022 जिंकला आहे. भारताला यंदाच्या सिरीजमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. भारताचा शेवटचा सामना अफगाणिस्तानशी खेळला गेला. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट जबरदस्त चालली. कोहलीने शानदार फलंदाजी करताना टी-20 कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. कोहलीचे हे शतक 1020 दिवसांनंतर झालं आहे. या सामन्यानंतर टीमचा कर्णधार रोहित शर्माने बीसीसीआय टीव्हीवर विराटची मुलाखत घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटच्या खेळीचं कौतुक करताना रोहित म्हणाला की, तू चांगले शॉट्स खेळलेस आणि गॅपमध्ये योग्य पद्धतीने शॉट्स खेळलेस. शिवाय तू योग्य गोलंदाजांना लक्ष्य केलं.


रोहित विराटला म्हणाला, "विराट तुझं खूप खूप अभिनंदन. संपूर्ण भारत तुमच्या 71 व्या शतकाची वाट पाहत होता आणि मला माहित आहे की तुम्ही त्याची सर्वात जास्त वाट पाहत होता. एवढ्या वर्षात तू तुझा खेळ खेळण्यात घालवलेला वेळ मोलाचा ठरेल हे आम्हाला माहीत होतं, पण आजचा डाव खूप खास होता कारण आम्हाला विजयासह पूर्ण करायचं होतं. तू आज तुझ्या खेळीबद्दल सांग, तू सुरुवात कशी केलीस ते सर्वांना सांग."


रोहितचा हा प्रश्न ऐकून विराट हसला आणि कॅप्टनला ट्रोल केलं. विराट म्हणाला, 'आज पहिल्यांदा माझ्यासोबत शुद्ध हिंदी बोलतोय.' यावर रोहितने सांगितलं की, त्याची योजना हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषा एकत्र बोलण्याची होती, पण जर त्याला हिंदीमध्ये चांगली लय मिळाली. त्यामुळे त्याने या भाषेत बोलण्याचा निर्णय घेतला.


इंटरव्यू पाहण्यासाठी इथे क्लिक करा


या मुलाखतीदरम्यान विराट कोहली म्हणाला, "रोहित तुझे खूप खूप आभार. आजचा दिवस आपल्या टीमसाठी खूप खास होता. आपण आजचा सामना कसा खेळतो याचा परिणाम महत्त्वाचा होता. ही टूर्नामेंट टीमसाठी महत्त्वाची होती. या टूर्नामेंटनंतरही आपला ध्येय स्पष्ट आहे, ते म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये होणारा वर्ल्डकप."


कोहलीने त्याचे 71 वं आंतरराष्ट्रीय शतक झळकावून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगची बरोबरी केली आहे. कोहलीने जवळपास तीन वर्षांच्या खराब फॉर्मनंतर त्याचं पहिलं शतक झळकावलं. सर्वाधिक शतकांच्या बाबतीत, कोहलीच्या पुढे फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनच्या नावावर 100 शतकं आहेत. त्याचे चाहते त्याच्या या शतकाची 1020 दिवसांपासून वाट पाहत होते.