मागे वळून बघायची गरज नाही...; कर्णधारपदी येताच विराटबद्दल रोहितचं मोठं वक्तव्य
रोहित शर्माने वर्ल्डकप, राहुल द्रविड आणि माजी कर्णधार विराट कोहलीबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटच्या कर्णधारपदाची धुरा आता रोहित शर्माकडे देण्यात आलेली आहे. दरम्यान इतकी मोठी जबाबदारी स्वीकारल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच उघडपणे बोलला आहे. रोहित शर्माने वर्ल्डकप, राहुल द्रविड आणि माजी कर्णधार विराट कोहलीबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
यावेळी टीम इंडियाचा नवा कर्णधार रोहित शर्माने माजी कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केलंय. एक फलंदाज म्हणून संघात त्याची भूमिका किती महत्त्वाची आहे याबाबत देखील रोहित शर्माने सांगितलं आहे.
बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत रोहित शर्माने विराट कोहलीबद्दल म्हणाला, 'विराट कोहलीने टीमचं चांगलं नेतृत्व केलं आहे आणि आता टीम अशा ठिकाणी आहे जिथून मागे वळून पाहायचं नाहीये. विराटच्या नेतृत्वाखाली टीमला एकच संदेश होता की, आपल्याला जिंकण्यासाठी खेळावं लागेल.'
कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, 'मी विराटसोबत खूप क्रिकेट खेळलो आहे, तेव्हापासून मला खूप मजा आली आहे. आम्ही एक टीम म्हणून पुढे जात राहू आणि अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करू.'
आता वनडेच्या कर्णधारपदाची धुराही रोहित शर्माच्या हाती आली आहे. T-20 चे कर्णधारपद स्वीकारल्यानंतरही रोहित शर्मा विराट कोहलीबद्दल बोलत होता. रोहित म्हणाला होता की, विराट जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे, तो टीममधील एक लीडर आहे. अशा परिस्थितीत टीममध्ये फलंदाज म्हणून त्याची भूमिका खूप महत्त्वाची असते.