मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचं आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपुष्टात आलं. मुंबईचा कर्णधार आणि दिग्गज खेळाडू रोहित शर्माला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये ९४ रनची खेळी केल्यानंतरही संपूर्ण आयपीएलमध्ये रोहितला फक्त २८६ रन बनवता आल्या. रोहित शर्माला मुंबईनं १५ कोटी रुपये देऊन टीममध्ये कायम ठेवलं होतं. रोहितला दिलेले पैसे आणि त्यानं केलेल्या रन याचा हिशोब लावला तर मुंबईनं रोहितच्या प्रत्येक रनसाठी ५.२० लाख रुपये मोजले. तर मुंबईकडूनच खेळलेला लेग स्पिनर मयंक मार्कंडेनं रोहितपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मयंकला मुंबईनं २० लाख रुपयांना विकत घेतलं होतं. मयंकनं १५ मॅचमध्ये १४ विकेट घेतल्या. मयंक आणि रोहितच्या कामगिरीवर नजर टाकली तर रोहितनं केलेल्या ४ रनएवढंच मानधन मयंकला आयपीएलच्या संपूर्ण मोसमासाठी मिळालं. 


दिल्लीच्या मॅक्सवेलकडूनही निराशा


संदीप लमिचाने हा आयपीएलमध्ये नेपाळकडून खेळणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. १७ वर्षांच्या संदीपनं त्याच्या लेग स्पिन बॉलिंगनं सगळ्यांचीच मनं जिंकली. संदीप लमिचानेनं ३ मॅचमध्ये ५ विकेट घेतल्या. पण दिल्लीच्या टीममधलाच त्याचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनं निराशाजनक कामगिरी केली. मॅक्सवेलनं आयपीएलमध्ये फक्त १६९ रन केले. दिल्लीनं मॅक्सवेलला ९ कोटी रुपयांना विकत घेतलं. मॅक्सवेलनं केलेली प्रत्येक रन दिल्लीला ५.३० लाख रुपयांना पडली. मॅक्सवेलच्या ४ रन एवढंच मानधन संदीप लमिचानेला दिल्लीनं दिलं.