मुंबई : आयपीएल 2022 चा (IPL 2022) हंगाम काहीच महिन्यांपुर्वी संपन्न झाला. या हंगामात नवख्या गुजरात टायटन्सने बाजी मारली. या हंगामानंतर आता 2023 च्या हंगामाची आतुरता क्रिकेट चाहत्यांना लागली असताना आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विदेशी खेळाडूने राजस्थान रॉयल्सच्या मालकावर गंभीर आरोप केला आहे. नेमका हा आरोप काय आहे ? आणि हा खेळाडू कोण आहे ते जाणून घेऊयात.  
  
राजस्थान रॉयल्स (rajsthan royals) संघाचा माजी खेळाडू आणि न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलरने (ross taylor) त्याच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' या आत्मचरित्रात धक्कादायक खुलासा केला आहे. टेलरने या पुस्तकात म्हटलंय की, राजस्थान रॉयल्सकडून खेळताना एका प्रसंगी तो शून्यावर बाद झाला. या घटनेनंतर संघ मालकाने त्याला कानशिलात लगावल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोप काय?
टेलरने आत्मचरित्रात म्हटलेय, 'राजस्थानचा संघ मोहालीत किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. मी शून्य धावसंख्येवर एलबीडब्ल्यू आऊट झालो आणि आम्ही लक्ष्य गाठू शकलो नाही. नंतर टीम, सहाय्यक कर्मचारी आणि व्यवस्थापन हॉटेलच्या वरच्या मजल्यावरील बारमध्ये जमले होते. यावेळी वॉर्नसोबत लिझ हर्लेही तिथे उपस्थित होती.


या दरम्यान राजस्थान रॉयल्सचा एक ओव्हनर मला म्हणाला, 'रॉस, आम्ही तुला डक वर आउट 
होण्यासाठी एक मिलियन डॉलर्स दिले नाहीत. त्यानंतर त्याने माझ्या तोंडावर 3-4 वेळा चापट मारली.अशी कृती करत असताना तो हसत होता आणि ते जोरजोरात मारले गेले नव्हते, असे त्याने म्हटलेय. पुढे तो म्हणतोय, पण हे निव्वळ नाटक होत याची मला खात्री नव्हती. परिस्थितीनुसार मला हा मुद्दा बनवायचा नव्हता, परंतु अनेक व्यावसायिक क्रीडा वातावरणात हे घडण्याची मी कल्पना करू शकत नाही, असेही त्यांनी म्हटलेय. 


आयपीएल कारकिर्द 
रॉस टेलर (ross taylor) 2008 ते 2010 पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळला आणि त्यानंतर 2011 मध्ये राजस्थान रॉयल्स संघात सामील झाला. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि पुणे वॉरियर्स इंडियाचेही प्रतिनिधित्व केले. रॉस टेलरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण 55 सामने खेळले. ज्यामध्ये त्याने 3 अर्धशतकांच्या मदतीने 1017 धावा केल्या आहेत. आयपीएलमधील टेलरची सर्वोत्तम धावसंख्या 81 नाबाद आहे.