`कप्तान को बोल मैं खेलूंगा...`, रक्ताच्या उलट्या केल्यानंतरही युवी असं काय बोलला? श्रीसंतने सांगितला अंगावर काटा येणारा अनुभव
Sreesanth on Yuvraj Singh : शरीर पोकळं होत असतानाही युवराजने देशासाठी वर्ल्ड कप खेळला... नव्हे नव्हे तर जिंकवला सुद्घा... याच युवराजच्या संघर्षावर टीम इंडियाला फास्ट गोलंदाज एस श्रीसंत याने मोठं वक्तव्य केलं आहे.
Happy Birthday Yuvraj Singh : परिस्थिती कोणतीही असो... मैदानात येयचं अन् संघाला वाईट परिस्थितीतून बाहेर काढायचं. सामना जिंकवायचा अन् पार्टी करायची, असा पंजाबी मुंडा म्हणजे सिक्सर किंग युवराज सिंग... व्हॉईट बॉल क्रिकेटमधील सर्वात बेस्ट खेळाडू असलेला युवराज सिंग (Yuvraj Singh) आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2019 मध्ये क्रिकेटला रामराम ठोकणाऱ्या युवराजची वर्ल्ड कप 2011 ची कहाणी आजही अनेक खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. शरीर पोकळं होत असतानाही युवराजने देशासाठी वर्ल्ड कप खेळला... नव्हे नव्हे तर जिंकवला सुद्घा... याच युवराजच्या संघर्षावर टीम इंडियाला फास्ट गोलंदाज एस श्रीसंत (S Sreesanth) याने मोठं वक्तव्य केलं आहे.
युवीने कॅन्सर असूनही संपूर्ण सामना कसा खेळला यावर त्याने थरारक किस्सा सांगितला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना युवीला रक्ताच्या उलट्या होत होत्या. आम्ही ते सर्व पाहिलं आहे. त्याला असं खेळताना पाहून आम्हाला दु:ख झालं होतं, त्याला रिटायर्ड होण्यासाठी सर्वांनी सांगितलं. भर उन्हात युवराज वेस्ट इंडिजविरुद्ध धावा मोजत होता. मी त्याच्याजवळ मेसेज आणि पाणी घेऊन गेलो, तेव्हा त्याने मैदान सोडण्यास साफ नकार दिला. 'मी खेळेन... तू जाऊन कोच आणि कॅप्टनला सांग.. मी खेळेन'. युवराजचे ते शब्द अजूनही माझ्या कानात गुणगुणत असतात, असं एस श्रीसंतने म्हटलं आहे.
कॅन्सरविरुद्ध युवराजने फाईट दिली. अनेकांना ते जमत नाही, पण युवराजने करून दाखवलं. कॅन्सरनंतर युवराज संपला असं सर्वांना वाटत होतं. मात्र, त्याला पुन्हा मैदानात येऊन खेळायचं होतं. युवराज पुन्हा कमबॅक करेल यावर अनेकांचा विश्वास नव्हता. मात्र, तो पुन्हा आला आणि धमाकेदार 150 धावांची खेळी केली. मला त्याला बघून खूप आनंद झाला होता. युवराजने खऱ्या अर्थाने स्वत:ला सिद्ध केलंय. आजही जेव्हा युवराज भेटतो, तेव्हा मला खूप आनंद होतो, असंही श्रीसंतने म्हटलं आहे.
दरम्यान, मी जेव्हा 18 किंवा 19 वर्षांचा होतो, मी जेव्हा इंडियन एअरलाइन्सकडून खेळायचो, त्यावेळी युवराजही इंडियन एअरलाइन्सकडून खेळायचा. सामन्यानंतर, जेव्हा मी ड्रेसिंग रूममध्ये होतो, तेव्हा युवी मला भेटला आणि काही गोष्टी सांगितल्या ज्या मी आजपर्यंत विसरलो नाही. "श्रीशांत, सर्व काही सोड, सर्व काही पार्टी करणे सोड, आता क्रिकेटवर लक्ष केंद्रित कर, तू भारतासाठी खेळू शकतोस. तू अशीच गोलंदाजी करत राहिलास तर एक दिवस लवकरच तू भारतासाठी क्रिकेट खेळशील", असं युवीने मला म्हटलं होतं, असा किस्सा श्रीसंतने सांगितला आहे.