मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर्वांचा लाडका क्रिकेटपटू त्याची महती भारतातच नाही तर जगभरात आहे अशा सचिनचा आज 48वा वाढदिवस आहे. मास्टर ब्लास्टर सचिनने 664 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले असून त्यामध्ये 34 हजार 357 धावा करण्याचा विक्रम केला आहे. 100 शतक आणि 164 अर्धशतक देखील ठोकले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकरच्या तुफान फलंदाजीचे सर्वच फॅन आहेत. त्याने केलेले विक्रम आणि त्याची खेळण्याची स्टाइल याबाबत सर्वांनाच माहिती आहे. पण त्याची पत्नी अंजलीबद्दल काही खास गोष्टी खूप कमी लोकांना माहिती आहेत. आज सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्याला कायम साथ देणाऱ्या अंजिली विषय आज जाणून घेऊया.


अंजली आणि सचिन यांची पहिली भेट कुठे आणि कशी झाली असेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 6 वर्षांनी मोठ्या असलेल्या अंजलीला सचिनने पहिल्यांदा विमानतळावर पाहिलं होतं. मात्र दोघांचं भेटणं होऊ शकलं नाही.


सचिन 1990 रोजी मुंबई विमानतळावर आपल्या करियरमधील पहिला इंग्लंड दौरा पूर्ण करून मायदेशात परतला होता. इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यात त्याने शतक पूर्ण केलं होतं. त्यावेळी सचिन 17 वर्षांचा होता. तिथे अंजली आपल्या मैत्रीणीसोबत आईला विमानतळावरून घेऊन जाण्याठी आली होती. 


सचिनला पाहाताच मैत्रीण डॉ. अपर्णानं अंजलीला त्याचाबद्दल सांगितलं. त्यावेळी सचिनचा ऑटोग्राफ घेण्यासाठी ती त्याचा पाठलाग करू लागली. मात्र सचिनला थोडं विचित्र वाटलं आणि तो थेट आपल्या गाडीच्या दिशेनं निघून गेला. अंजलीचे त्याला भेटण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. 


अंजली मात्र त्याला विसरू शकली नाही. तिने  पुढे आपल्या मित्र-मैत्रीणींना त्याचा फोन नंबर शोधून काढण्यासाठी कामाला लावलं. अंजलीनं एका मुलाखतीत त्या संदर्भातील किस्से सांगितले आहेत. अंजलीनं त्याचा नंबर शोधून काढल्यानंतर त्याला फोन केला. तिने सचिनला विमानतळावर पाहिल्याचं सांगितलं. त्यावर सचिननेही हो मी तुम्हाला पाहिलं तुम्ही माझा पाठलाग करत होतात असं उत्तर दिलं. 


हळूहळू त्या दोघांचं फोनवर बोलणं सुरू झालं आणि भेटायचं ठरलं. भेटीचं ठिकाण सचिनचं घर निश्चित झालं. अंजलीनं सचिनच्या घरी जाता यावं म्हणून पत्रकार असल्याचं खोटं सांगत घरात प्रवेश केला. सचिनच्या घरीच दोघंही भेटले आणि अंजलीनं त्याला पहिली भेट म्हणून चॉकलेट दिलं


अंजली खरंच पत्रकार आहे का असा प्रश्न त्यावेळी सचिनच्या आईला पडला. त्यांनी अंजलीला चॉकलेट देताना पाहिलं होतं. त्यानंतर हळूहळू दोघांमधील मैत्री खुलली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले.


अनेकदा सचिनला अंजलीला भेटण्यासाठी एकतर वेशांतर तरी करावं लागत असे किंवा ती जिथे डॉक्टरची प्रॅक्टीस करत होती तिथे जावं लागत असे. एकदा तर सिनेमागृहात वेशांतर करून गेलेल्या सचिनला लोकांनी ओळखलं आणि दोघांनाही चित्रपट अर्धवड सोडून निघून जावं लागलं.


जगातील सर्वात वेगवान गोलंदाजाच्या बॉलवर खेळण्यापेक्षा अंजलीबद्दल घरी बोलणं कठीण असल्याचं त्यावेळी सचिन तेंडुलकर म्हणाला होता. ही जबाबदारी देखील त्याने अंजलीवर सोपवली होती. दोघांनी 5 वर्ष एकमेकांना वेळ दिला. अंजलीने पुढाकार घेऊन घरी सांगितलं आणि न्यूझीलंड दौऱ्यावर असताना दोघांनीही लग्न केलं.