Sachin Tendulkar Deepfake Video: दाक्षिणात्य अभिनेत्री स्मृती मंधाना काही आठवड्यांपूर्वी डीपफेक व्हिडीओमुळे चर्चेत होती. यावर तिनेच स्पष्टीकरण दिलं होतं. आता अशाच पद्धतीने भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने स्वत:चा एक व्हायरल होत असलेला मॉर्फ व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सचिन तेंडुलकरच्या मुलीच्या नावाने खोटी जाहिरात केली जात असून यासंदर्भातच चुकीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला व्हिडीओ शेअर करत सचिनने 'हा मी नव्हेच' असं म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या खोट्या व्हिडीओत सचिनच्या मुलीचा म्हणजेच सारा तेंडुलकरच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. व्हिडीओमधील दावे चुकीचे असून अशापद्धतीने सोशल मीडियावरुन काही पसरत असेल तर त्या माध्यमांनीही तातडीने प्रतिसाद दिला पाहिजे अशी अपेक्षा सचिनने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सचिनने त्याच्या चाहत्यांनाही एक विनंती केली आहे.


व्हायरल व्हिडीओमध्ये काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन तेंडुलकरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो एका गेमिंग अ‍ॅप्लिकेशनची जाहीरात करताना दिसतोय. "माझी मुलगी सध्या हा गेम खेळतेय. या गेमबद्दल सध्या प्रत्येकजण चर्चा करत आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की चांगल्या मार्गाने पैसा कमवणं किती सोपं झालं आहे. सर्वात रंजक गोष्ट ही आहे की हे अ‍ॅप्लिकेशन अगदी मोफत उपलब्ध आहे. आयफोन असलेली कोणतीही व्यक्ती हे डाऊनलोड करु शकते," असं सचिन बोलत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.


सत्य काय?


हा व्हिडीओ नीट पाहिला तर सचिनच्या तोंडाची हलचाल आणि शब्द जुळून येत नसल्याचं स्पष्टपणे कळतंय. हा व्हिडीओ एडीट करण्यात आला आहे हे नीट पाहिल्यास लगेच समजतं. सचिननेही हेच पोस्ट केलं आहे की हा व्हिडीओ खोटा आहे. 


सचिन काय म्हणाला?


सचिनने चुकीच्या पद्धतीने फसवणूक करत तयार करण्यात आलेला हा व्हिडीओ शेअर करत, "हे व्हिडीओ खोटे आहेत. हे व्हिडीओ तुम्हाला फसवण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. तंत्रज्ञानाचा असा चुकीच्या पद्धतीने वापर करणे फार अयोग्य आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्हाला असे व्हिडीओ किंवा अ‍ॅप्लिकेशन दिसले तर तातडीने त्यांना रिपोर्ट करा," असं सचिन म्हणाला आहे.


सरकारकडे मागणी


सचिनने या पोस्टमध्ये माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांनाही टॅग केलं आहे. "सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सावधान, सतर्क राहिलं पाहिजे. तसेच या माध्यमांसंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेतली पाहिजे. यासंदर्भात या माध्यमांचं काय म्हणणं आहे हे फार महत्त्वाचं आहे. चुकीची माहिती, सूचना या माध्यमातून पसरवली जाऊ नये आणि डीपफेक व्हिडीओंचा वापर संपुष्टात यावा यासाठी हे फार महत्त्वाचं आहे," असं सचिन या 3 अकाऊंटला टॅग करुन म्हटलं आहे.



सेलिब्रिटीही सुटलेले नाहीत


मागील काही काळामध्ये एआयसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करुन लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार फार मोठ्या प्रमाणात वाढले असून अगदी भारतरत्नसारखा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेली सचिनसारखी व्यक्तीही यातून सुटलेली नाही.