मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जगातल्या बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. याचा फटका क्रीडा स्पर्धांनाही बसला आहे. जगभरातल्या जवळपास सगळ्याच क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नजीकच्या भविष्यातही क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांशिवाय भरवायचा क्रीडा संघटनांचा विचार आहे. सचिन तेंडुलकरचं मत मात्र याबाबत वेगळं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'प्रेक्षक नसलेल्या स्टेडियममध्ये खेळणं खेळाडूंसाठी निराशाजनक असेल. अनेकवेळा खेळाडू हे प्रेक्षकांना प्रतिक्रिया देतात. जर मी एखादा चांगला शॉट खेळला आणि प्रेक्षकांनी जल्लोष केला, तर माझा उत्साह आणखी वाढतो. तसंच एखादा बॉलर चांगला स्पेल टाकत असेल आणि प्रेक्षकही त्याला पाठिंबा देत असतील, तर त्याला आणखी चेव येतो. प्रेक्षक हे खेळाचा अविभाज्य भाग आहेत. प्रेक्षकांच्या घोषणा आणि त्यांचा जल्लोष खेळासाठी गरजेचा आहे,' असं सचिन म्हणाला.


'कोरोनाच्या संकटानंतर खेळाडू बॉलला थुंकी लावताना विचार करतील. या गोष्टी त्यांच्या मनात असतील. विकेट घेतल्यानंतर खेळाडू कदाचित गळाभेटही घेणार नाहीत. त्यामुळे खेळ पुन्हा सुरू करायचा असेल, तर पहिले गोष्टी सामान्य होऊ द्या. पहिले वातावरण चांगलं आणि सुरक्षित झालं पाहिजे,' अशी प्रतिक्रिया सचिनने दिली.


आयपीएल ऑक्टोबर महिन्यात होईल, यंदाची स्पर्धा छोटी असेल, असं मी ऐकतोय, पण सरकार आणि बीसीसीआय खेळाडू आणि प्रेक्षकांची योग्य काळजी घेऊन निर्णय घेतील, असं सचिन म्हणाला.