IPL मध्ये फ्लॉप झाल्यानंतर अर्जुनच्या करिअरबद्दल सचिनचं मोठं विधान; म्हणाला `माझ्यासारखं त्यालाही...`
Sachin Tendulkar on Arjun Tendulkar Career: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) क्रिकेट करिअरवर भाष्य केलं आहे. आपण लहान असताना जे वातावरण मला मिळालं तसंच वातावरण त्याच्यासाठीही तयार करण्याचा माझा प्रयत्न असल्याचं सचिनने म्हटलं आहे. तसंच यावेळी त्याने अर्जुन तेंडुलकरला आपल्या खेळावर लक्ष्य केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.
Sachin Tendulkar on Arjun Tendulkar Career: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा असल्याने क्रिकेटविश्वाच लक्ष अर्जुन तेंडुलकरकडे (Arjun Tendulkar) आहे. त्यातच सध्याच्या आयपीएलमध्ये त्याला पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळण्याची संधी देण्यात आली. पण अर्जुन या संधीचं सोनं करु शकला नाही. आयपीएलमध्ये तो फक्त चार सामने खेळू शकला. यामध्ये त्याने तीन विकेट घेतल्या आणि 19 धावा केल्या. दरम्यान, सचिन तेंडुलकरने अर्जुन तेंडुलकरच्या क्रिकेटमधील भविष्यावर भाष्य केलं असून त्याला आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. तसंच आपण लहान असताना जे वातावरण मला मिळालं तसंच वातावरण अर्जुनसाठीही तयार करण्याचा माझा प्रयत्न असल्याचं सचिनने म्हटलं आहे.
'Scintillating Sachin' च्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान सचिन तेंडुलकरने तुमच्या आजुबाजूला मदतशीर वातावरण असणं किती महत्त्वाचं आहे यावर प्रकाश टाकला. सचिनने यावेळी आपल्याला लहानपणी घरात जे वातावरण मिळालं, तसंच त्यालाही मिळावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. सचिनला क्रिकेट खेळताना सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर याचा मोठा पाठिंबा मिळाला.
"मला माझ्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळाला होता. माझा भाऊ अजित तेंडुलकरने कोणत्याही बाबतीत तोडगा काढण्यासाठी नेहमी पुढे होता. नितीन तेंडुलकर माझ्या वाढदिवसाला नेहमी चित्र काढत असे. माझी आई एलआयसीमध्ये कामाला होती. तर माझे वडील प्रोफेसर होते. त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. माझं सर्व पालकांना आवाहन आहे की, आपल्या मुलांनाही स्वातंत्र्य द्या," असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.
दरम्यान नुकतंच आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुनबद्दल विचारण्यात आलं असता सचिनने त्याला आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत कर असा सल्ला दिला. "मला मिळालं तेच वातावरण त्याच्यासाठी तयार करण्याचा माझा प्रयत्न आहे. जेव्हा तुम्ही स्वत:ला शाबासकी देता, तेव्हा लोकही तुमचं कौतुक करतात. आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत कर असं माझे वडील मला सांगायचे आणि आता मी अर्जुनला तेच सांगत आहे," असं सचिनने म्हटलं आहे.
अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएल पदार्पणासह हे एकमेक पिता-पुत्र ठरले आहेत, जे आयपीएलमध्ये खेळले आहेत. "मी निवृत्ती घेतल्यानंतर मीडियाने माझा सत्कार केला होता. त्यावेळी मी मीडियाकडे अर्जुनला खेळाच्या प्रेमात पडण्यासाठी योग्य ती वेळ द्या अशी विनंती केली होती. पत्रकारांना ते स्वातंत्र्य दिलं याबद्दल मी त्यांचा आभारी आहे," असं सचिनने सांगितलं.
सचिन यावेळी आपल्या आईने लहानपणी घेतलेल्या कष्टांच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाला होता. तसंच आपल्या पत्नीने सर्जरी रोखण्यात महत्त्वाची भूमिका निभावल्याचं सांगितलं. "ऑस्ट्रेलिया दौऱ्यात असताना मला खूप दुखापती झाल्या होत्या. त्यामुळे मी दोन्ही पायांची सर्जरी करणार होतो. पण अंजली ऑस्ट्रेलियात आली आणि सर्जरी रद्द करायला लावली. दुखापतींमुळे मी खूप निराश होतो, पण अंजलीने काळजी घेतली," असं सचिनने सांगितलं.