नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लोकपाल डीके जैन यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना तंबी दिली आहे. हे तिघेही सध्या क्रिकेट विश्वचषकात समालोचन करत आहेत. मात्र, त्यांच्या या भूमिकेवर डीके जैन यांनी आक्षेप नोंदवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे तिघेही जण आयपीएलमधील काही संघांशी जोडले गेले आहेत. मग ते विश्वचषकात समालोचक म्हणून कसे काम करू शकतात? डी.के. जैन यांच्या या आक्षेपानंतर हे प्रकरण बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीकडे जाऊ शकते. 


याविषयी बोलताना प्रशासकीय समितीच्या एका सदस्याने सांगितले की, आमची समिती जैन यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांविषयी विचारविनिमय करत आहे. यावर लवकरच काहीतरी तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी म्हटले. 


लोकपाल डीके जैन यांचा आक्षेप काय? 


आयपीएलमधील एखाद्या संघाशी हितसंबंध असणारे माजी क्रिकेटपटू विश्वचषकात समालोचन कसे करु शकतात. त्यांनी अजूनही क्रिकेटमधून संन्यास घेतलेला नाही. मग ते टेलिव्हिजन एक्स्पर्टची भूमिका कशी पार पाडू शकतात, असा सवाल डीके जैन यांनी केला.



हरभजन आणि पार्थिव पटेलही अडचणीत
सचिन, सौरव आणि लक्ष्मण यांच्याशिवाय भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह आणि पार्थिव पटेल हेदेखील विश्वचषकात समालोचक म्हणून काम करत आहेत. आयपीएलच्या गेल्या हंगामात हे दोघे आपापल्या संघांकडून मैदानातही उतरले होते. 


लोढा समितीच्या शिफारशींचे उल्लंघन
जैन यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकारामुळे लोढा समितीने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत आहे. कारण समितीच्या नियमांनुसार एका खेळाडुला एकच पद मिळू शकते, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.