Road Safety World Series 2021: सचिन, यूसुफनंतर आणखी एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
यापूर्वी सचिन तेंडूलकर, यूसुफ पठाण, एस बद्रीनाथ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मुंबई: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूपैकी एक-एका खेळाडूचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागल्यानं खळबळ उडाली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यापाठोपाठ यूसुफ पठाणलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. आता आणखी एका खेळाडूचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
भारतीय संघाचा माजी ऑलराउंडर खेळाडू इरफान पठानचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याने याची माहिती ट्वीट करून सर्वांना दिली आहे. तर आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करून घेण्याचं आवाहन देखील त्याने केलं आहे. सचिन आणि यूसुफ यांना कोरोना झाल्यानंतर इतर खेळाडूंच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आलीच होती.
इरफान पठाणने ट्वीट करून माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या माझ्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत आणि मी स्वत: ला घरी क्वारंटाइन केलं आहे. अलिकडच्या काळात जो कोणी माझ्या संपर्कात आला आहे त्याने आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करतो असं ट्वीट केलं आहे.
यापूर्वी सचिन तेंडूलकर, यूसुफ पठाण, एस बद्रीनाथ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सचिन, यूसुफ आणि इरफान पठाण तिघेही रोड वर्ल्ड सेफ्टी सीरिजमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे इतर खेळाडूंनाही त्यांनी कोरोना टेस्ट करून घेण्याचं आवाहन केलं आहे.