`तुझी आठवण काढतोय...`, शोएबच्या तिसऱ्या पत्नीच्या एक्स पतीची भावनिक पोस्ट
सनाने शोएब मलिकसोबत लग्न केल्यानंतर आता तिचा पहिल्या नवऱ्याच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
Umair Jaswal Instagram Story : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोएब मलिक तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नानंतर शोएब आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचा संसार मोडला आहे. सनाने शोएब मलिकसोबत लग्न केल्यानंतर आता तिचा पहिला नवरा उमैर जसवालच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
सना जावेदचा पहिला पती उमैर जसवाल हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो इन्स्टाग्रामवर सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकतंच उमैर जसवालने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत त्याने दोन ओळी पोस्ट केल्या आहेत. अनेक नेटकरी त्याच्या या पोस्टचा संबंध शोएब आणि सनाच्या लग्नासोबत लावत आहेत.
आणखी वाचा : सना जावेदचा दुसरा पती शोएब मलिक, पहिल्या पतीबद्दल माहितीये का?
उमैरची 'ती' पोस्ट चर्चेत
उमैरने पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये "देवाशी बोल. तो तुझी आठवण काढतोय", असे म्हटले आहे. त्याची ही सूचक पोस्ट नेमकी कशाबद्दल आहे, याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही. पण सध्या त्याची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. उमैर हा पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक आहे. त्याबरोबरच तो अभिनेता, गायक, गीतकार आणि संगीत निर्माता म्हणूनही सक्रीय आहे. तो रॉक बँडचा प्रमुख गायक आहे. सना आणि उमैर यांचा 2020 मध्ये निकाह झाला होता. मात्र काही वर्षांनी त्यांच्यात खटके उडू लागले. त्यामुळे गेल्यावर्षी 2023 मध्ये त्या दोघांनी रितसर घटस्फोट घेतला. यानंतर आता सना ही शोएब मलिकसोबत लग्नबंधनात अडकली.
शोएब मलिक तिसऱ्यांदा विवाहबंधनात
शोएब मलिकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत निकाह केल्याचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. त्याच्या या फोटोला कॅप्शन देताना शोएबने Alhamdullilah, आणि आम्ही दोघेही आता जोडी म्हणून एकत्र आलो, असे म्हटले आहे. शोएब मलिक आणि सना जावेदच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शोएब आणि सानियाच्या घटस्फोट झाला?
दरम्यान शोएबचे हे तिसरे लग्न असून सनाचे हे दुसरे लग्न आहे. शोएबने 2002 मध्ये आयेशा सिद्दीकीसोबत लग्न केले होते. मात्र त्या दोघांनी 2010 ला घटस्फोट घेतला. त्यानंतर तो 2010 मध्ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झासोबत लग्नबंधनात अडकला. यानंतर आता 2024 मध्ये शोएबने तिसऱ्यांदा निकाह केला आहे. त्याने सना जावेदसोबत लग्न केल्याचे जाहीर केले आहे. पण त्याचा आणि सानिया मिर्झाचा घटस्फोट झाला का? याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.