Sanju Samson First ODI Century :  भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात (IND vs SA) टीम इंडियाने दमदार विजय मिळवला असून सिरीजवर देखील कब्जा केलाय. अखेरच्या सामन्यात हिरो ठरला तो संजू सॅमसन... संजूने स्लो पिचवर शतक ठोकून आपल्या क्षमतेचं प्रदर्शन केलंय. संजू सॅमसनने (Sanju Samson) आपल्या 8 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदा शतकी खेळी केली, यामध्ये 6 फोर आणि 3 सिक्सचा समावेश आहे. शतकीय खेळीनंतर संजू सॅमसनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


काय म्हणाला संजू सॅमसन?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर आज मला खूप भावूक वाटतंय. माझ्या अनेक भावना सध्या उफाळून येत आहेत. मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप मेहनत घेत आहे आणि आता माझ्या बाजूने निकाल येत असल्याचे पाहून मला आनंद होतोय. नवीन बॉलने साऊथ अफ्रिकन गोलंदाजांनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली आणि केएल आऊट झाल्यानंतर बॉल जुना होत गेला आणि फलंदाजी करणं अधिक कठीण झालं, असं संजूने म्हटलं आहे.


आम्ही आज अतिरिक्त ऑलराऊंडर खेळाडू खेळवत होतो, त्यामुळे टिळक आणि मी ठरवलं होतं की आम्हाला 40 व्या षटकापासून कठोर परिश्रम करावे लागतील, असं संजू सॅमसन म्हणाला आहे.



कॅप्टन केएल राहुल म्हणतो... 


संजू सॅमसनसाठी मी खरोखरच आनंदी आहे. तो एक अभूतपूर्व खेळाडू आहे, त्याने आयपीएलमध्ये खूप काही केलंय, पण आज खूप आनंद झाला आहे, असं कॅप्टन केएल राहुल याने म्हटलं आहे.


दरम्यान, केरळाच्या संजू सॅमसमने 2015 मध्ये टी20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तर 7 वर्षानंतर म्हणजेच 2021 मध्ये त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. अशातच आता संजूने शतक झळकावल्यानंतर त्याच्या फॅन्सचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. संजूने गेल्या 8 वर्षात 24 टी20 सामने खेळला आहे. तर गेल्या तीन वर्षात त्याच्या वाटेला केवळ 15 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आलेत. तरी देखील संजूला पुरेशी संधी मिळाली नाही, अशीच चर्चा होताना दिसते.