मुंबई : मुंबईचा तडाखेबाज क्रिकेटपटू श्रेयस अय्यरनं टी-२० क्रिकेटमध्ये विक्रमाला गवसणी घातली आहे. श्रेयस अय्यर हा टी-२० क्रिकेटमध्ये एका इनिंगमध्ये सर्वाधिक रन करणारा भारतीय बनला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेमध्ये सिक्कीमविरुद्ध मुंबईकडून खेळताना श्रेयस अय्यरनं ५५ बॉलमध्ये १४७ रनची खेळी केली. श्रेयस अय्यरच्या या खेळीमध्ये तब्बल १५ सिक्स आणि ७ फोरचा समावेश होता. श्रेयस अय्यरच्या या खेळीमुळे मुंबईचा या मॅचमध्ये १५४ रननी विजय झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या १४७ रनबरोबरच श्रेयसनं ऋषभ पंत, मुरली विजय, सुरेश रैना या खेळाडूंना मागे टाकलं. ऋषभ पंतनं २०१८ साली आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळताना १२८ नाबाद रन केल्या होत्या. २०१० साली आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळताना मुरली विजयनं १२७ रनची खेळी केली. २०१८ साली उत्तर प्रदेशकडून खेळताना सुरेश रैनानं नाबाद १२६ रन आणि २०१३ साली दिल्लीकडून खेळताना उन्मुक्त चंद यानं १२५ रनची खेळी केली होती.



या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे ११ रनवर आणि पृथ्वी शॉ १० रनवर आऊट झाले. यानंतर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी तब्बल २१६ रनची भागीदारी केली. सूर्यकुमार यादवनं ३३ बॉलमध्ये ६३ रन केले. या दोघांच्या भागीदारीमुळे मुंबईनं २० ओव्हरमध्ये २५८/४ एवढा स्कोअर केला.



या स्कोअरमुळे टी-२० मॅचमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या भारतातल्या टीममध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. आयपीएलमध्ये २०१३ साली पुण्याविरुद्ध बंगळुरूनं २६३/५ एवढा स्कोअर केला होता.


२५९ रनचा पाठलाग करायला आलेल्या सिक्कीमला २० ओव्हरमध्ये फक्त १०४/७ एवढाच स्कोअर करता आला. यामुळे मुंबईनं ही मॅच १५४ रननी जिंकली. आयपीएलमध्ये श्रेयस अय्यर हा दिल्लीच्या टीमकडून खेळतो. मागच्या वर्षी गौतम गंभीरनं खराब फॉर्ममुळे आयपीएल अर्ध्यात सोडली होती. यानंतर श्रेयस अय्यरकडे दिल्लीच्या टीमचं नेतृत्व देण्यात आलं. यावर्षीही श्रेयस अय्यरच दिल्लीच्या टीमचं नेतृत्व करणार आहे.