भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) मुख्य प्रक्षिक्षक राहुल द्रविडचा (Rahul Dravid) कार्यकाळ संपत आला आहे. आयसीसी टी-20 वर्ल्डकपनंतर राहुल द्रविड प्रशिक्षकपदावरुन पायउतार होणार आहे. यामुळे आता बीसीसीआय नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. नव्या प्रशिक्षकाचा कार्यकाळ साडे तीन वर्षांचा असणार आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ पुढच्या महिन्यात संपत असला तरी बीसीसीयआने त्याच्यासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशिक्षकपदासाठी इच्छुकांना अर्ज करण्यासाठी 27 मे 2024 अंतिम तारीख आहे. जर राहुल द्रविडला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कायमचं राहायचं असेल तर त्याला नव्याने अर्ज करावा लागणार आहे. जून महिन्यात सुरु होणारी टी-20 वर्ल्डकप स्पर्धा संपताच 1 जुलैपासून नवा प्रशिक्षक पदभार स्विकारणार आहे. हा कार्यकाळ 31 डिसेंबर 2027 पर्यंत कायम असेल. 


राहुल द्रविडची कार्यकाळ वाढवण्याची इच्छा का नाही?


Sportstar च्या रिपोर्टनुसार, राहुल द्रविडने याआधीच वैयक्तिक कारणामुळे आपण प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राहुल द्रविडने मार्च महिन्यात आयपीएल 2024 सुरु होण्यापूर्वीच बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्याला कुटुंबासह वेळ घालवायचा असल्याचं सांगितलं होतं. भारतीय क्रिकेट संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंनीही अजून किमान एक वर्ष प्रशिक्षकपदी राहण्यासाठी विनंती केली आहे. पण राहुल द्रविडची अजिबात इच्छा नाही. टी-20 वर्ल्डकपनंतर पद सोडण्यावर तो ठाम आहे. 


लक्ष्मणही इच्छुक नाही


रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि नॅशनल क्रिकेट अकादमीचा प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणही प्रशिक्षकपदी येण्यासाठी इच्छुक नाही. राहुल द्रविड पायऊतार झाल्यानंतर लक्ष्मण प्रशिक्षकपदी येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. लक्ष्मण गेल्या 3 वर्षांपासून नॅशनल क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी आहे. एशियन गेम्सदरम्यान राहुल द्रविडच्या गैरहजेरीत लक्ष्मणने तात्पुरतं प्रशिक्षकपद स्विकारलं होतं. लक्ष्मण इंग्लंड, न्यूझीलंड आणि आयर्लंड विरुद्धच्या द्विपक्षीय T20I मालिकेत टीम इंडियाचा प्रशिक्षक होता.


नवा प्रशिक्षक कोण असेल?


राहुल द्रविड पायऊतार होण्याच्या तयारीत असताना आणि लक्ष्मण इच्छुक नसताना, आयपीएल संघांच्या मुख्य प्रशिक्षकांचा विचार केला जात आहे. आयपीएलच्या मुख्य प्रशिक्षकांना वर्ल्डकपनंतर त्यांची उपलब्धता निश्चित करण्यासाठी या पदासाठी अर्ज करावा लागेल. रिपोर्टनुसार, चेन्नई सुपरकिंग्जचा मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि लखनऊ सुपर जायंट्सचा जस्टिन लँगर ही दोन प्रमुख नाव समोर येत आहेत, जे पदासाठी अर्ज करण्यात इच्छुक आहेत.