नवी दिल्ली : टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर सेरेनाने तिचा फोटोही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. आई होणं हा जगातला सर्वात मोठा आनंद असतो आणि तो आनंद सध्या ती अनुभवत आहे. पण, आपल्या चिमुकल्या मुलीसोबत हा आनंद अनुभवत असताना एक चिंता तिला सतावते आहे. या चिंतेमुळे अस्वस्थ झालेल्या सेरेनाने तिच्या आईला एक भावनिक पत्र लिहिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेरेनाच्या मुलीची प्रकृती ही उत्तम आहे. ती आपल्यावरच गेलीये याचं कौतुक तिला आहे. पण त्याचबरोबर एक अनामिक भितीही तिला छळते आहे आणि हिच भीती तिने पत्राद्वारे आईला बोलून दाखवली. ‘फार कमी वयातच दमदार खेळांमुळे मी नाव कमावलं, लोकांनी माझ्या खेळाचं कौतुक केलंच पण माझ्या दिसण्यावरून टिकाही केली. मी पुरुषासारखी दिसते. महिलांच्या गटातून खेळण्याऐवजी मी पुरुषांच्या गटातून खेळलं पाहिजे, अशा प्रकारच्या अवहेलना अनेकदा माझ्या वाट्याला आल्या. लहानपणापासून माझ्या शरीरयष्टीवरून मी अनेक टोमणे ऐकले. लोक माझ्यावर हसायचे. माझे हात, पाय सारंकाही पुरुषांसारखंच आहे. मी सुंदर असण्यापेक्षा राकट आहे, असे अनेक शेरे माझ्यावर मारले जायचे. हे सर्व ऐकताना तुला किती त्रास झाला असेल याची जाणीव याक्षणी मला प्रकर्षाने होतेय. माझ्यावर इतक्या टीका होत असताना तू त्या शांतपणे ऐकल्यास, त्या प्रत्येक व्यक्तीला जाब विचारायला तू का गेली नाहीस? याचं मला आश्चर्य वाटतं. 


तू शांतपणे सारं काही हाताळलं. महिला या किती शक्तिशाली असू शकतात हे जगाला दाखवणं तुझ्यामुळे शक्य झालं. माझी मुलगी माझ्यासारखीच दिसते, उद्या तिलाही रुपावरून अनेक बऱ्या वाईट गोष्टी ऐकाव्या लागतील. हे माझ्या कानावर पडलं तर मी कशी वागेन मला माहिती नाही. पण जेव्हा मी तुझा विचार करते तेव्हा मला आणखी बळ मिळतं. माझ्या मुलीला वाढवताना हेच बळ मला उपयोगी पडणार आहे. खडतर काळातही तू आमच्या पाठीशी उभी राहिली हे मी कधीच विसरणार नाही’ असं भावनिक पत्र तिने लिहिलं आहे.