Shahid Afridi Slams Team India Fans: हातात तिरंगा, अंगावर भारतीय संघाची जर्सी, भोगे, गालावर काढलेले झेंडे अन् एकच जल्लोष अशा उत्साहामध्ये रविवारी दुपारी भारतीय संघाचे पाठीराखे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कप 2023 ची फायलन पाहण्यासाठी दाखल झाले होते. खचाखच भरलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील खुर्चा या भगव्या रंगाच्या आहेत हे एरियल शॉट दरम्यान समालोचकांना सांगावं लागलं एवढ्या मोठ्या प्रमाणात निळ्या जर्सीमधील चाहत्यांची गर्दी मैदानात दिसत होती. मात्र या चाहत्यांच्या पदरी निराशाच पडली. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते बॉलिवूड स्टार्सपर्यंत अनेक अति महत्त्वाच्या व्यक्तींनी हजेरी लावलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा 6 विकेट्सने पराभव झाला. ऑस्ट्रेलियन संघाने यजमान संघाला पराभूत करत सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. या सामन्यानंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने भारतीय चाहत्यांवर टीका केली आहे.


मैदानामध्ये स्मशान शांतता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅट कमिन्सने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. शुभमन गिल स्वस्तात तंबूत परतला. शुभमन 4 धावा करुन बाद झाल्यानंतरही रोहित शर्माने त्याची स्फोटक फलंदाजी सुरु ठेवली. रोहित शर्माने चौकार, षटकारांची आतिषबाजी केल्यानंतर मैदानामध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. मात्र रोहितने 47 धावा अवघ्या 31 बॉलमध्ये केल्या. मात्र ग्लेन मॅक्सवेलला मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित झेलबाद झाला. पुढच्या 4 बॉलमध्येच श्रेयस अय्यरही बाद झाल्याने भारतीय संघाचे 3 गडी तंबूत परतले. त्यानंतरपासून भारतीय चाहत्यांचा उत्साह मावळत गेला आणि सामना एका क्षणी अशा स्थितीत आला की सामन्या संपण्याआधीच अनेक भारतीय चाहते मैदानाबाहेर पडले. भारतीय फलंदाजांना तब्बल 172 बॉलमध्ये एकही चौकार अथवा षटकार मारता आला नाही. या संथ खेळीमुळे आणि एकंदरितच सामन्यातील भारताची स्थिती पाहून प्रेक्षकांमध्ये स्मशान शांतता पसरली होती. 


भारतीय प्रेक्षक प्रतिसाद देत नाहीत


मैदानात उपस्थित असलेल्या एकूण 90 हजारांहून अधिक भारतीय क्रिकेट चाहत्यांनी भारतीय संघाला योग्य पद्धतीने प्रोत्साहन दिलं नाही अशी टीका सोशल मीडियावर होत आहे. अशातच शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानमधील 'समा टीव्ही' या वृत्तवाहिनीवरील एका चर्चासत्रात भारतीय प्रेक्षकांवर टीका केली आहे. भारतीय चाहत्यांनी सामना पाहण्यासाठी केलेल्या प्रेक्षकांनी ट्रॅव्हिस हेडच्या शतकाचं कौतुक करणं अपेक्षित होतं असं विधान आफ्रिदीने केलं आहे. "प्रत्येक खेळाडूने त्याच्या करिअरमध्ये कधी ना कधी हे अनुभवलं असेल. जेव्हा आम्ही चौकार मारतो किंवा शतक झळकावतो किंवा विकेट घेतो तेव्हा (भारतीय) प्रेक्षक प्रतिसाद देत नाहीत," असं आफ्रिदी म्हणाला.


नक्की वाचा >> 'भाजपचा ‘वंशवाद’ भारतीय क्रिकेटचे..'; World Cup Final हरल्यानंतर जय शाहांवर ठाकरे गटाचा हल्लाबोल


खेळावरील भारतीयांच्या प्रेमाबद्दल उपस्थित केलं प्रश्नचिन्ह


वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी आलेल्या भारतीय प्रेक्षकांवर टीका करताना शाहीद आफ्रिदीने भारतीयांच्या खेळावरील प्रेमाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत भारतीय प्रेक्षकांवर टीकास्त्र सोडलं. "ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावलं तेव्हा भारतीय चाहते शांत का होते? खेळाची आवड असलेला देश कोणत्याही खेळाडूच्या कामगिरीचं किंवा प्रयत्नांचं कौतुकच करतो. मात्र कथित सुशिक्षित भारतीय फॅन्सकडून हे असं काही पाहायला मिळालं नाही. ते शतक एवढं मोठं होतं की किमान काही लोकांनी तरी उभं राहून त्याचं कौतुक करायला हवं होतं. तसेच ज्या पद्धतीने भारतीय संघाची बॉडी लँग्वेज ज्या पद्धतीने पडत होती ते पाहूनही प्रेक्षकांचा प्रतिसाद नव्हता," असं म्हणत थोड्या संतापलेल्या स्वारातच शाहीद आफ्रिदीने म्हटलं.


नक्की वाचा >> 'मला घाणेरडे...'; ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर मॅक्सवेलची भारतीय वंशाची पत्नी संतापली


कमिन्सने सामन्याआधीच केलेलं विधान


पॅट कमिन्सने भारतामध्ये भारताविरुद्ध खेळताना सव्वा लाखाच्या गर्दीला आपल्या कामगिरीमधून शांत करण्यासारखं दुसरं सुख नाही असं म्हटलं होतं. भारताविरुद्ध खेळताना आम्ही भारतीय चाहत्यांना जास्त आनंद साजरा करण्याची संधीच देणार नाही असंही कमिन्सने म्हटलेलं. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या कामगिरीमधून हे खरं करुन दाखवलं.