मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले आहेत. क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा बहिष्कार करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारताच्या काही माजी क्रिकेटपटूंनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. यातच आता पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं त्यांचे पंतप्रधान इम्रान खानच्या सुरात सूर मिसळला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर झालेल्या आरोपांचं स्पष्टीकरण देण्यासाठी इम्रान खान यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची काहीही भूमिका नसल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इम्रान खान यांच्या या प्रतिक्रियेवर शाहिद आफ्रिदीनं एक ट्विट केलं. 'हे पाऊल ठोस आणि स्पष्ट आहे.' असं ट्विट शाहिद आफ्रिदीनं केलं. शाहिद आफ्रिदी हा सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये मुल्तान सुल्तान टीमकडून खेळत आहे.



काय म्हणाले इम्रान खान?


पाकिस्तानवर होत असलेल्या आरोपानंतर इम्रान खान यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. यामध्ये इम्रान खान म्हणाले 'भारतावर हल्ला करून आम्हाला काय मिळणार आहे? हा नवा पाकिस्तान आहे. आम्हाला देशात स्थैर्य हवे आहे. आता कुठे आम्ही त्या दिशेने वाटचाल करायला लागलो आहोत. मग अशावेळी भारतावर हल्ला करून आम्हाला कोणताही फायदा होणार नाही.'


'भारत आमच्यावर हल्ला करण्याचा विचार करत असेल आणि आम्ही प्रतिकार करणार नाही, असे कोणाला वाटत असेल तर ते पूर्णपणे चूक आहे. आम्ही भारताच्या हल्ल्याला नक्कीच प्रत्युत्तर देऊ. युद्ध सुरू करणे हे आपल्या हातात असते. मात्र, हे युद्ध आपल्याला कोणत्या दिशेने घेऊन जाईल, हे देवालाच माहिती आहे. त्यामुळे ही समस्या चर्चेनेच सोडवली पाहिजे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत कोणतेही पुरावे नसताना पाकिस्तानवर आरोप करत आहे. पाकिस्तानातील कोणीही हिंसा न करणे, हेच आमच्या देशासाठी हिताचे आहे. यानंतरही भारताने पाकिस्तानमधील कोणाविरुद्ध पुरावे दिले तर आम्ही त्यांच्यावर जरूर कारवाई करू, असे आश्वासन यावेळी इम्रान खान यांनी दिले.'


काय म्हणाले नरेंद्र मोदी?


पुलवामा हल्ल्यानंतर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आता चर्चेची वेळ निघून गेली आहे. आता जगाला एकत्र येऊन दहशतवाद आणि त्याच्या समर्थकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई न करणं म्हणजे दहशतवाद वाढवणं आहे. तसंच भारतीय सैन्याला कारवाईसाठी खुली सूट देण्यात आली आहे.'