बांगलादेशच्या शाकिब अल हसनचा ऐतिहासिक विक्रम
बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकिब अल हसननं विक्रम केला आहे.
मुंबई : बांगलादेशचा तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20मध्ये अफगाणिस्ताननं १ रननं पराभव केला. याबरोबरच ३ टी-20 मॅचची ही सीरिज अफगाणिस्ताननं ३-०नं जिंकली आहे. शेवटच्या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या अफगाणिस्ताननं २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून १४५ रन केले. शेवटच्या ओव्हरमध्ये बांगलादेशला विजयासाठी ४ रनची आवश्यकता होती. पण महमदुल्लाह दोन रन केल्यानंतर आऊट झाल्यामुळे बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला. ही सीरिज बांगलादेशला गमवावी लागली असली तरी त्यांचा टी-20 टीमचा कर्णधार शाकिब अल हसननं नवं रेकॉर्ड बनवलं आहे.
या मॅचदरम्यान शाकिबनं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट मिळून १० हजार रन आणि ५०० विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. हे रेकॉर्ड करणारा शाकिब तिसरा खेळाडू बनला आहे. शाकिबआधी दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलीस आणि पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर हे रेकॉर्ड होतं.
शाकिबनं फक्त ३०२ मॅचमध्ये (टेस्ट, वनडे आणि टी-20) हे रेकॉर्ड स्वत:च्या नावावर बनवलं. शाकिब आयसीसीच्या टेस्ट आणि वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा ऑल राऊंडर आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये शाकिबनं नजिबुल्लाह जार्डनची विकेट घेतली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली ५००वी विकेट पूर्ण केली.
जॅक कॅलीसनं त्याच्या कारकिर्दीत ५१९ मॅचमध्ये २५ हजार ५३४ रन केल्या आणि ५७७ विकेट घेतल्या. शाहिद आफ्रिदीनं ५२४ मॅचमध्ये ११ हजार १९६ रन केल्या आणि ५४१ विकेट घेतल्या. भारताचा माजी कर्णधार कपिल देवनं ३५६ मॅचमध्ये ९ हजार ३१ रन केल्या आणि ६८७ विकेट घेतल्या होत्या.