Ex Cricketer Slams Jay Shah​: टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर चार दिवस वादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकलेला भारतीय संघ गुरुवारी (4 जुलै 2024 रोजी) पहाटे भारतात दाखल झाला. आधी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर ब्रेकफास्ट केल्यानंतर सायंकाळी मुंबईमध्ये चाहत्यांच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा केल्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये संपूर्ण संघाचा सत्कार करण्यात आला. मात्र या संपूर्ण सोहळ्यादरम्यान अनेक चाहत्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पदाधिकारी उगाच प्रकाशझोतात येत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते असं वाटलं. याच मुद्द्यावरुन 1983 साली भारताला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या संघातील माजी क्रिकेटपटूने संताप व्यक्त करत बीसीसीआयचे सचीव जय शाह तसेच संस्थेचे अधिकारी असलेल्या राजीव शुक्ल यांचा उल्लेख करत निर्ल्लजपणे संधीसाधूपणा केल्याचा घणाघात केला आहे.


जगात असं कुठेही घडत नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेमध्ये पश्चिम बंगालमधील बर्धमान दुर्गापूर येथून चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी वानखेडेवरील सोहळ्यातील दोन फोटो शेअर करत बीसीसीआयच्या पादाधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. जगभरामध्ये कुठेही घडत नाही असा विचित्र प्रकार भारतात खेळाडूंचा सान्मान करताना घडल्याची टीका आझाद यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवरुन केली आहे. "खरं तर वर्ल्ड कप अमित शाहांचे पुत्र जय शाह आणि राजीव शुक्ल यांनी जिंकला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि भारतीय संघ हा केवळ सहाय्यक होते," असा उपहासात्मक टोला किर्ती आझाद यांनी लगावला आहे.


नक्की वाचा >> 'वानखेडेबाहेर हाथरससारखी चेंगराचेंगरी झाली असती; देवाचे आभार मानले पाहिजेत की मुंबईत..'


नेमकं काय आहे पोस्टमध्ये?


तसेच पुढे बोलताना, "जगभरात कुठेही सत्कार समारंभादरम्यान अधिकाऱ्यांना संघाबरोबर बसत नाहीत. निर्ल्लज संधीसाधू लोक," अशा कॅफ्शनसहीत किर्ती आझाद यांनी वानखेडेवरील सत्कार समारसंभातील 2 फोटो शेअर केले आहेत. यापैकी एका फोटोमध्ये जय शाह आणि राजीव शुक्ल हे विराट कोहलीच्या आजूबाजूला पहिल्या रांगेत बसल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये संपूर्ण भारतीय संघ फोटोसाठी मैदानावर ठेवलेल्या खुर्च्यांवर बसलेले असताना जय शाह आणि राजीव शुक्ल हे हार्दिक पंड्या आणि बुमराहच्या मध्ये पहिल्या रांगेत विराट कोहली तसेच वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन बसलेल्या कर्णधार रोहित शर्माच्या सोबतीने बसल्याचं दिसत आहे.



बसमध्येही अधिकारी दर्शनी भागी


विश्वविजेत्या संघाचं जंगी स्वागत करताना खुल्या बसमधून काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यानही राजीव शुक्ल यांच्यासहीत जय शाह आणि इतरही अनेक पदाधिकारी बऱ्याच वेळेस बसच्या पुढील दर्शनी भागी उभी असल्याचं पाहायला मिळालं. या सर्व पदाधिकाऱ्यांचं हे पुढेपुढे करणं अनेक चाहत्यांना खटकं असून सोशल मीडियावरुन त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशी नाराजी व्यक्त करतानाच आता यामध्ये माजी क्रिकेटपटूंचीही भर पडल्याचं पाहायला मिळत आहे.