IND vs PAK: रविवारी टी-20 वर्ल्डकपमधील हाय व्होल्टेज असा भारत विरूद्ध पाकिस्तान सामना रंगला होता. या सामन्यात भारताने 6 रन्सने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानी टीम विजयाच्या अगदी जवळ येऊनही हरली. त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांमध्ये संतापाचे वातावरण दिसून आलं. अशातच उरूज जावेद नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचा पराभव पाहून एक महिला रडताना दिसतेय. दरम्यान ही महिला दुसरी कोणी नसून पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान कादिरची पत्नी सोबिया खान आहे. भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर ही महिला रडू लागली आणि तिचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उरुज जावेद नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, निर्लज्ज लोकांनी आपल्याच वहिनीला रडवलं. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. इतकंच नाही तर लोकं या व्हिडीओवर कमेंटही करतायत. यावेळी एका युझरने, असा पराभव पाकिस्तानी टीमसाठी नवीन नसल्याचं म्हटलंय. 



भारताविरूद्ध पाकिस्तानचा पराभव


न्यू यॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात भारताच्या फलंदाजांनाही साजेसा खेळ करता आला नाही. भारतीय फलंदाज पूर्ण 20 ओव्हर्स देखीस खेळू शकले नाहीत. टीम इंडियाचा खेळ अवघ्या 119 रन्सवर आटोपला. पाकिस्तान ज्यावेळी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरली तेव्हा पहिल्या 10 ओव्हर्समध्ये टीमने चांगली कामगिरी केली. एकवेळ 13व्या ओव्हर्समध्ये पाकिस्तानच्या टीमने 2 विकेट गमावून 73 रन्स केले. यानंतर फखर जमान बाद झाला. शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये इमाद वसीम आणि इफ्तिखार अहमद यांची फलंदाजी फारशी चांगली झाली नाही. अखेरीस पाकला 6 रन्सने भारताकडून पराभव स्विकारावा लागला.


कोण आहे उस्मान कादिर?


लेग स्पिन गोलंदाज उस्मान कादिरने 2020 मध्ये पाकिस्तानसाठी टी-20 चा पहिला सामना खेळला. उस्मानने आतापर्यंत देशासाठी 25 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 31 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याचा इकॉनॉमी रेट 8 पेक्षा कमी आहे. तो पाकिस्तानसाठी वनडे सामनाही खेळला होता, ज्यामध्ये त्याला फक्त एक विकेट घेता आली होती.