Shane Warne : ...जेव्हा ढसाढसा रडला होता शेन वॉर्न
शेन वॉर्नच्या आयुष्यात अनेक घटना घडल्या. त्यापैकी एक घटना अशी आहे ज्यामुळे वॉर्नचं संपूर्ण आयुष्य पालटलं.
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्नचं काल निधन झालं. शेन वॉर्नच्या अचानक जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. थायलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी शेन वॉर्न गेला होता आणि त्याचठिकाणी त्याचा मृत्यू झाला. वयाच्या 52 व्या वर्षी वॉर्नने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत मैदानाव्यतिरीक्त तो बाहेरील विवादांमुळेही चर्चेत राहिला होता.
शेन वॉर्नच्या आयुष्यात अनेक घटना घडल्या. त्यापैकी एक घटना अशी आहे ज्यामुळे वॉर्नचं संपूर्ण आयुष्य पालटलं. या घटनेनंतर त्याच्या आयुष्यातील तो सर्वात वाईट काळ असल्याचं त्याने म्हटलं होतं.
शेन वॉर्नला वर्ल्डकपच्या टीममधून काढलं होतं बाहेर
2003 साली दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संपूर्ण ऑस्ट्रेलिया टीम वर्ल्डकपची तयारी करत असताना वॉर्नची ड्रग्ज टेस्ट कऱण्यात आली. त्याची ही टेस्ट पॉझिटीव्ह आली. यानंतर वॉर्नला तातडीने ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा आदेश देण्यात आला. यावेळी खेळाडूंना स्पष्टीकरण देताना तो ढसाढसा रडला होता.
फॉक्स क्रिकेटला दिलेल्या इंटरव्यूमध्ये वॉर्न म्हणाला की, "क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मला मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला. मला टीमशी बोलायचं होतं. वर्ल्डकपच्या निमित्ताने मी त्यांची माफी मागत होतो, मला खूप वाईट वाटलं कारण आम्ही एकत्र वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांच्यासमोर मी ढसाढसा रडलो."