सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्न यानं आगामी वर्ल्ड कपबाबत भाकीत केलं आहे. ऑस्ट्रेलिया हा वर्ल्ड कप जिंकू शकते, असं वॉर्नला वाटत आहे. ऑस्ट्रेलियाची टीम २०१८-१९ या वर्षात खराब फॉर्ममध्ये आहे. भारतानं ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या घरच्या मैदानात २-१नं पराभव केला. आता ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातही ते २-० ने पिछाडीवर आहे. पण स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनानंतर ऑस्ट्रेलियाची टीम मजबूत होईल, असं वॉर्न म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्मिथ आणि वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. या दोघांच्या निलंबनाचा कालावधी या महिन्यात संपणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपच्या टीममध्ये दोन्ही खेळाडूंची निवड जवळपास निश्चित आहे.


पुनरागमनानंतर स्मिथ आणि वॉर्नरची विजयाची भूक वाढली असेल, याचा ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कपमध्ये फायदा होईल, असं वॉर्न म्हणाला. २००३च्या वर्ल्ड कपवेळी प्रतिबंधित औषधांचं सेवन केल्याप्रकरणी शेन वॉर्नचं निलंबन करण्यात आलं होतं. यानंतर शेन वॉर्न पुनरागमन करु शकणार नाही, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. पण वॉर्ननं हे सगळे अंदाज फोल ठरवले आणि क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन केलं. फॉक्स स्पोर्ट्सशी बोलताना शेन वॉर्ननं स्वत:चा अनुभव सांगितला.


'अनेक वेळा जेव्हा तुम्हाला अनिवार्य विश्रांती दिली जाते, जसं माझ्यासोबत झालं. मला १२ महिने टीमबाहेर राहावं लागलं होतं. या विश्रांतीमुळे तुमचा मेंदू ताजातवाना होतो. तुमच्यामधली भूक वाढते. तसंच क्रिकेट आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे खेळाडूला कळतं. या कारणामुळे ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकेल असं मला वाटतं. स्मिथ-वॉर्नरचं टीममध्ये थेट पुनरागमन होईल. त्यांच्यामधली भूक वाढली असेल. सुरुवातीच्या काही मॅचमध्ये ते नर्वस असतील, पण हे त्यांच्यासाठी चांगलं असेल', असं वक्तव्य शेन वॉर्ननं केलं.


याआधी शेन वॉर्ननं भारत आणि इंग्लंड या दोन टीम वर्ल्ड कप जिंकू शकतात, असं विधान केलं होतं. आता शेन वॉर्ननं भारत आणि इंग्लंडबरोबरच ऑस्ट्रेलियाही वर्ल्ड कप जिंकण्याचा दावेदार असल्याचं म्हटलं आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक ५ वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. मागच्यावेळी २०१५ साली झालेल्या वर्ल्ड कपवरही ऑस्ट्रेलियानं नाव कोरलं होतं.