हैदराबाद : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंवर कारवाई झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर वर्षभराची तर कॅमरून बँकरॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही कारवाई केली आहे.


आयपीएललाही मुकणार स्मिथ-वॉर्नर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही कारवाई केली असल्यामुळे स्मिथ आणि वॉर्नरला आयपीएलही खेळता येणार नाही. स्मिथ हा राजस्थान रॉयल्सचा तर वॉर्नर हा सनरायजर्स हैदराबादचा खेळाडू आहे. राजस्थान रॉयल्सनं स्मिथऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवलं आहे. वॉर्नर हैदराबादचा कर्णधार आहे, पण त्याच्याऐवजी कोण नवा कर्णधार असेल याविषयी हैदराबादनं अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.


शिखर धवनकडे टीमचं नेतृत्व?


डेव्हिड वॉर्नर नसल्यामुळे हैदराबादकडे शिखर धवन, इओन मॉर्गन, केन विलियमसन आणि भुवनेश्वर कुमार यांच्यापैकी एकाला कर्णधार बनवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण विलियमसनची टीममधली जागा पक्की नाही तर भुवनेश्वर कुमारला कर्णधारपदाचा अनुभव नाही. त्यामुळे धवन किंवा मॉर्गनकडे कर्णधारपदाची सूत्र जाऊ शकतात.


धवनच्या जमेच्या बाजू


शिखर धवन हा भारतीय आहे. तसंच गेल्या अनेक वर्षांपासून तो हैदराबादकडून खेळत आहे. धवनची हैदराबादच्या टीममधली जागा निश्चित आहे. याआधी धवननं हैदराबाद आणि दिल्लीच्या टीमचं नेतृत्व केलं आहे. बीसीसीआयनंही धवनशी सर्वाधिक किंमतीचा म्हणजेच ए प्लसचा करार केला आहे. कर्णधारपदाचा दबाव घेऊन शिखर धवन खेळणार नाही. या सगळ्या जमेच्या बाजू असल्यामुळे धवनची हैदराबादचा कर्णधार म्हणून निवड होऊ शकते.